केळना नदीच्या पुलावर चकमक; आरोपी आणि पोलिसांमधील गोळीबाराने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 01:57 PM2021-06-16T13:57:51+5:302021-06-16T14:00:40+5:30
परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते.
- फकिरा देशमुख
भोकरदन : जाफराबाद रोडवरील केळना नदीच्या पुलावर पाठलागा दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर प्रतिउत्तरात एका पोलिस कर्मचाऱ्याने देखील गोळीबार केल्याची घटना बुधवारी ( दि. १६ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. दरम्यान, गोळीबार करणारे आरोपी आणि त्यांचा पाठलाग करणारे पोलीस याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. गोळीबारानंतर पोलिसांची जीप एका कारचा पाठलाग करत माहोरा गावाच्या दिशेने सुसाट वेगाने गेल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.
16 जून रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील केळना नदीवरील पुलावर वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान एक कार भरधाव वेगात पुढे आली. पाठोपाठ एक जीपसुध्दा आली. या वाहनांनी पूल ओलांडला तोच एक पोलीस कर्मचारी जीपमधून उतरला आणि त्याने कारच्या दिशेने गोळी झाडली. त्यापूर्वी कारमधील एकाने पोलिसांच्या दिशेने गोळी झाडल्याची चर्चा आहे. मात्र, उपस्थित नागरिकांना गाडीचे टायर फुटले असेल अशी शंका वाटली. परंतु, पोलिसांच्या गोळीबारामुळे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धावपळ केली.
परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस ?
परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. याशिवाय यातील काही आरोपी भोकरदन येथे गाडीतून उतरल्याची चर्चा आहे. याबाबत भोकरदनच्या पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांनी सांगितले की, नेमके प्रकरण काय आहे हे सांगता येणार नाही. मात्र, जिंतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी डॉ. श्रवण दत्त यांनी संबंधित पोलिसांना मदत करण्याचा फोन केला होता. याबाबत लोकमत प्रतिनिधीने श्रवण दत्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण माहिती हाती आल्यानंतर याबद्दल सांगता येईल अशी प्रतिक्रिया दिली.