नोकरी सोडून फुलविली द्राक्षबाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2020 11:57 PM2020-03-12T23:57:35+5:302020-03-13T00:00:03+5:30
नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तळणी : नोकरी सोडून वडिलोपार्जित शेतात एकत्रित कुटुंबपद्धती जोपासत भावांच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये युवा शेतकरी बंधुंनी द्राक्ष बाग फुलविली आहे. ही द्राक्ष बाग पाहण्यासाठी व खरेदीसाठी मराठवाड्यासह विदर्भातील शेतकरी व व्यापारी भेट देत आहेत.
कानडी (ता. मंठा) येथील आश्रुबा वामनराव खंदारे व राजेश वामनराव खंदारे यांच्याकडे वडिलोप्रार्जित २० एकर शेतजमीन आहे. खंदारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक पिके घेतात. पण, अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. आश्रुबा खंदारे हे महाविद्यालय प्रयोग शाळा सहायक म्हणून काही दिवसांपूर्वी नोकरी करीत होते. उच्चशिक्षित असतानाही शेतीपेक्षा नोकरी उत्तम या मानसिकतेला छेद देत नोकरी सोडून एकत्रित कुटुंब पद्धती जोपासत त्यांनी भावाच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत एक एकरमध्ये द्राक्ष बाग फुलविली आहे.
मे २०१८ मध्ये लावगड केल्यानंतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत योग्य संगोपन केले. या दरम्यान ६ लाखांचा खर्च झाला. २२ महिन्यांची द्राक्ष बाग असून, योग्य भाव मिळाल्यास तब्बल १२ लाखांचे उत्पन्न होईल, असा विश्वास खंदारे बंधूंनी व्यक्त केला आहे.