उन्हाने फुलशेती कोमेजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 12:45 AM2019-04-05T00:45:17+5:302019-04-05T00:45:34+5:30
दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : दिवसेंदिवस उन्हाची तिव्रता वाढत असल्याने फुलेही कासावीस झाली असून ‘फुलशेती’ अडचणीत आली आहे.
तालुक्यात ‘फुलशेती’ करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या ठिकाणाहून फुले हैदराबाद, औरंगाबाद, जालनासह अन्य मोठमोठ्या शहरांत जातात. तालुुक्यातील वलखेड, चिंचोली, सालगाव, उस्मानपूर, बाबई, वरफळ, बामणीसह काही गावात फुलांची शेती शेतकरी करतात. यामध्ये गुलाब, निशिगंध, शेवंती, गलांडा, मोगरा, काकडा या फुलांची प्रामुख्याने शेती केली जाते. यातून शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळण्याबरोबरच शेतीला जोड धंदाही होतो. सध्या सर्वच फुलांना चांगला भाव आहे. दीडपट भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.
या फुलांच्या व्यवसायातून शेतक-यांना पैसाही मिळत आहे. मात्र, यावर्षी पाऊसच कमी झाल्याने जल साठ्यांनी तळ गाठला आहे. बोअर, विहिरी आटत आहेत. कधीच न आटणारे बोअर या वर्षी हबकले आहेत. यामुळे पिके तर सोडाच; पण जनावरे व माणसांना पाणी मिळणे अवघड होण्याची भीती आहे. यामुळे तालुक्यात असलेली फुलशेतीही शेवटच्या घटका मोजत आहे. फूल झाडांची महागाची आणून लावलेली रोपे व लगडलेली फुले करपून माना टाकू लागली आहेत. उन्हाची वाढती तीव्रता व पाण्याची अडचण यामुळे फूलशेती धोक्यात आली आहे. सद्या फुलाला चांगला भाव मिळत असला तरी, उन्हाने ती करपत आहे. त्यामुळे फुलांची प्रत खराब होण्याबरोबच उत्पन्नातही घट होत आहे. उन्हाच्या चटक्याने व शुष्क झालेल्या वातावरणाने फुले सुकली आहेत.