जालन्यात उत्पादन घटल्याने डाळींच्या भावामध्ये चढउतार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 11:54 AM2018-11-19T11:54:41+5:302018-11-19T12:14:21+5:30
बाजारगप्पा : जालना बाजारपेठेतील डाळींमधील तेजी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, ज्वारीसह उडदाच्या डाळीत अनुक्रमे ३०० आणि ४०० रुपयांची घसरण झाली आहे
- संजय देशमुख
जालना बाजारपेठेतील डाळींमधील तेजी कमी होण्याचे नाव घेत नसली तरी, ज्वारीसह उडदाच्या डाळीत अनुक्रमे ३०० आणि ४०० रुपयांची घसरण झाली आहे. असे असले तरी सोयाबीनमध्ये ५० रुपये प्रतिक्विंटल वाढ झाली आहे. सोयाबीनची आवकही गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३ हजार क्विंटलने कमी झाली आहे.
सोयाबीनला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत येत्या काही महिन्यांमध्ये चांगली मागणी राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणणे थांबविले असल्याचे सांगण्यात आले. सोयाबीनच्या पेंडेला मागणी असल्याने त्याचा कच्चा माल मोठ्या प्रमाणावर सोयाबीन हे पीक आहे. दुष्काळ असला तरी सोयाबीनच्या उत्पन्नात गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी सात टक्क्यांनी वाढ झाली आहे.
आता दिवाळी संपल्याने जालना बाजारपेठेत किराणा मालामध्ये फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे. पोहे, मुरमुरे यांच्या दरात घसरण झाली आहे. पोह्यामध्ये ५०० रुपयांची घट ही विक्रमी मानली जाते. साखर ‘जैसे थे’ आहे. ३,२०० ते ३,२८० एवढा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत साखरेच्या दरात क्विंटलमागे ५० रुपयांची घट झाली आहे. गुळाची आवकही जालना बाजारपेठेत तीन हजार भेली असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सांगण्यात आले. उडदाच्या डाळीमध्ये कधी घसरण, तर कधी अचानक तेजी येत आहे.
आठवड्याच्या प्रारंभी या डाळीत ४०० रुपयांची घट झाली होती, तर आठवडा सरतेशेवटी या डाळीच्या दरात चक्क १ हजार रुपये क्विंटलमागे वाढले आहेत. चना डाळीमध्ये ६,००० ते ६,२०० रुपये भाव कायम असून, यातही भावामध्ये चढ-उतार कायम आहे. आठवड्याच्या सरतेशेवटी तुरीमध्ये १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
मुगाची डाळ ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल विक्री होत असून, यामध्ये ७०० रुपयांची वाढ झाली आहे. मक्याची आवक ३ हजार क्विंटल असली तरी याचे भाव पाहिजे तेवढे वाढलेले नाहीत. सध्या मक्याला प्रतिक्विंटल १,३०० ते १,४५० रुपये भाव मिळत आहे. पोल्ट्री उद्योगासाठी मका आणि सोयाबीनची मागणी वाढल्याने हे दर भविष्यात कमी-जास्त होतील, असे सांगण्यात आले.
ज्वारीला मोठी मागणी आहे. दररोज ५०० ते ७०० पोती ज्वारीची आवक असून, यामध्ये मात्र ३०० रुपयांची घट झाली आहे. सध्या ज्वारीला २,५०० ते ३,२०० रुपयांचा भाव प्रतिक्विंटल मिळत आहे. कडधान्यामध्ये तेजी ही आगामी काळातही कायम राहील, असे चित्र आहे. पाऊस कमी झाल्याने यंदा डाळींचे उत्पादन गतवर्षीच्या तुलतेन घटल्याने हे भाव वाढत असल्याचे जाणकारांनी सांगितले.
दिवाळी संपल्यानंतर आता कापसाची खरेदी करण्यासाठी सीसीआयकडून प्रयत्न सुरू झाले आहेत; परंतु बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कापूस हा गुजरात आणि आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांना मिळेल त्या किमतीत विकला आहे. या व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांच्या दारात जाऊन कापूस खरेदी केला.