बायोडायव्हर्सीटी पार्कसाठी अर्जुन खोतकर यांचा पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:39 AM2019-07-20T00:39:23+5:302019-07-20T00:39:54+5:30
राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जालना : राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठवाडा व विदर्भातील वनस्पतीच्या स्थानिक प्रजाती नष्ट होत असून, मृद व जलसंधारण करावयाचे असल्यास तेथील स्थानिक प्रजातीचे राज्यामध्ये शासकीय जमिनीवर जिल्हानिहाय बायोडायव्हर्सीटी पार्क निर्माण करुन जतन करावे, असे नमूद केले होते. यावेळी इश्वेद बायटेकचे संजय वायाळ, आ. नागेश पाटील आष्टीकर यांची उपस्थिती होती.
खोतकर यांनी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडेही यासाठी पाठपुरावा सुरु केला आहे. त्यांच्या पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे खोतकर यांनी सांगितले. मराठवाड्यात विशेषत: जालन्यामध्ये वनाचे अत्यल्प प्रमाण पाहता खोतकर यांनी २२ जून रोजी जिल्ह्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वृक्ष लागवड ही व्यापक चळवळ करण्यासाठी पुढाकार घेतला. या बैठकमध्ये इश्वेद बायोटेकचे संजय वायाळ यांनी या कल्पनेला व्यापकता देण्यावर भर दिला. तेथूनच खोतकर यांनी जिल्ह्यातील सर्व अधिका-याबरोबर या संकल्पनेविषयी चर्चा केली. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनीही या प्रस्तावाबाबत त्वरीत आदेश निर्गमित होण्यासाठी आवश्यक त्या बाबी प्रशासनाच्या पातळीवरुन पुरविण्यात येतील याची ग्वाही दिली.
१०० एकरावर होणार पार्क
वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हानिहाय दौरे करुन राज्यामध्ये वनाची वृध्दी होण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हानिहाय दौरे पूर्वीच केलेले आहेत. त्यात त्यांनी जालना जिल्ह्यास भेट दिलेली आहे.
या बायोडायव्हर्सीटी पार्कच्या माध्यमातून लाखो झाडे जालना जिल्ह्यात लावली जाणार असून, १००- १०० एकरवर शासकीय जमिनीवर असे बायोडायव्हर्सीटी पार्क तयार करण्याचे नियोजित आहे.