परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी अन्नत्याग उपोषण
By विजय मुंडे | Published: November 28, 2023 07:07 PM2023-11-28T19:07:19+5:302023-11-28T19:07:35+5:30
ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी
जालना : परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे यासह इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने मुख्य समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे.
ब्राह्मण समाजातील तरूणांना रोजगार मिळावा तसेच ते स्वतःच्या पायावर उभे राहिवेत, यासाठी महाराष्ट्र राज्यातील समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी करीत आहे. या मागणीसाठी समस्त ब्राह्मण समाजाने मोर्चे काढून आंदोलनही केले आहे. आंदोलन करूनही राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा न केल्याने समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी मंगळवारपासून शहरातील गांधी चौकात अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे. महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून रणनवरे यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या उपोषणास समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी, ॲड. राजेंद्र पोतदार, श्रीकांत जोशी, विश्वजित देशपांडे, मंदार कुलकर्णी, मकरंद सोनसांवगीकर, महेश अकोलकर, दिनकर सापनाईकर हांडेराव पाटील, रावसाहेब पाटोदकर, शाम कुलकर्णी, प्रवीण जोशी, रेणुकादास मुळे, अशोक वाघ आदींनी पाठिंबा देत उपोषणात सहभाग नाेंदविला.
प्रारंभी दीपक रणनवरे यांनी समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची भूमिका मांडली. यावेळी धनंजय कुलकर्णी, विश्वजित देशपांडे,ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत नाईक, प्रा. एस. एम. देशपांडे, सिध्दीविनायक मुळे ,सौ. शुभांगी देशपांडे अँड सुरेश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी केली.
उपोषणाला विविध संघटनांचा पाठींबा
या उपोषणास मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राजेश राऊत, राजेंद्र गोरे, आशोक उबाळे, संजय देठे यांनी भेट देवून पाठींबा दिला. माळी समाजाच्या वतीने आमरदीप शिंदे, भाजपा जिल्हाध्यक्ष बद्रिभाऊ पठाडे, हिंदू महासभा धनसिंग सुर्यवंशी, काँग्रेसचे संजय लाखे पाटील, शरद देशमुख मावली कदम यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणस्थळाला भेट देवून मागण्यांना पाठींबा दर्शविला.