वन विभागाच्या हातावर तुरी देऊन बिबट्या शेतात पसार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:55 AM2018-05-23T00:55:26+5:302018-05-23T00:55:26+5:30
शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराजवळील तलावा शेजारी मंगळवारी दुपारी बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : शहरातील मत्स्योदरी देवी मंदिराजवळील तलावा शेजारी मंगळवारी दुपारी बिबट्या आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र वनविभागाच्या अधिका-यांनी हुलकावणी देऊन बिबट्या शेजारील शेतात पळाला. रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध सुरू होता.
मत्स्योदरी देवी तलावाजवळ गट क्रमांक १७७ / १ शिवनाथ पिराणे यांचे शेत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पिराणे यांचा सालगडी भगवान बर्डे शेतात काम करत असताना उसामध्ये बिबट्या झोपलेला दिसला. घाबरलेल्या बर्डे यांनी शेतमालक पिराणे यांना मोबाईलवरून शेतात बिबट्या असल्याची माहिती दिली. पिराणे यांनी शेताकडे धाव घेतली. शेतात बिबट्या असल्याची माहिती परिसरात वा-यासारखी पसरली. परिसरातील शेतकरी, नागरिकांनी पिराणे यांच्या शेतात गर्दी केली. शेतात बिबट्या आल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या अधिका-यांना दिली. पाचच्या सुमारास वनविभागाचे अधिकारी शेतात दाखल झाले. नागरिकांच्या गोंधळामुळे बिबट्या बाजूच्या शेतात पळाला. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिका-यांनी प्रयत्न केले. मात्र सायंकाळी सातच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत बिबट्या पळून गेल्याचे प्रदीप पिराणे, बंडू खांडेभराड, गणेश तुपे, दत्ता गाजरे, किरण वैद्य, शिवाजी गाजरे, भीमा पुंड, गजानन पुंड, महादू माळोदे, शिवा खांडेभराड, अशोक पुंड, गोविंद पुंड यांनी प्रत्यक्ष पाहिले. वनविभागाकडे रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध घेण्यात आला. मात्र, परिसरात कुठेच बिबट्या आढळून आला नाही. शहरातलगतच बिबट्या आढळल्याच्या प्रकारामुळे अंबड शहरासह परिसरात भीतीचे वातावरण आहे. बिबट्याला पकडण्यासाठी या भागात पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.