जिल्ह्यात लसीकरणाच्या तीन दिवसांत चार टक्के डोस वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:32+5:302021-01-22T04:28:32+5:30
जालना : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आजवर तीन वेळेस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी न लावल्याने काेरोनाचे ...
जालना : जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आजवर तीन वेळेस लसीकरण मोहीम राबविण्यात आली. लसीकरणावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी न लावल्याने काेरोनाचे जवळपास सरासरी चार टक्के डोस वाया गेले आहेत.
कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण केले जात आहे. जालना जिल्हा रुग्णालय, अंबड उपजिल्हा रुग्णालय, परतूर व भोकरदन ग्रामीण रुग्णालयात हे लसीकरण केले जात आहे. तीन दिवसांत १२०० जणांना लसीकरणासाठी बोलाविण्यात आले होते. त्यात ७९७ जणांनी लसीकरणास हजेरी लावली; तर ४०३ जणांनी लसीकरणाकडे पाठ फिरविली. वाईल फोडल्यानंतर संबंधित व्यक्ती लसीकरणासाठी न आल्याने तीन दिवसांत जवळपास ५३ कोरोनाचे डोस वाया गेले आहेत.
एका बाटलीत १० डोस
लसीच्या एका बाटलीतून दहाजणांना डोस देता येतो. ही बाटली काढल्यानंतर चार तासांत ती वापरणे आवश्यक असते; तसेच डोस भरतानाही काही प्रमाणात लस वाया जाण्याची शक्यता असते. साधारण १० टक्के डोस वाया जातात.
घाबरू नका
कोरोनाची लस दिल्यानंतर ताप येणे, उलट्या-मळमळ होणे असे शारीरिक त्रास होतात. काहींना तापही येऊ शकतो.
लसीकरण कोणतेही असो; लसीकरण झाल्यानंतर वरील प्रकारचा त्रास होतो. त्यामुळे लसीकरणानंतर त्रास होण्याच्या विविध प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे.
४२२०० डोस मिळाले जिल्ह्याला
००५३ डोस गेले वाया
०७९७ जणांना तीन दिवसांत दिले डोस
०४०३ जण अनुपस्थित राहिले.