शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू; मृतात सख्या भावंडांसह सालगडी बापलेकाचा समावेश
By विजय मुंडे | Published: June 6, 2023 07:51 PM2023-06-06T19:51:24+5:302023-06-06T19:52:20+5:30
नातेवाईकांच्या हंबरड्यामुळे पानावले ग्रामस्थांचे डोळे
- दादासाहेब जिगे
मठपिंपळगाव (जि.जालना) : शेततळ्यात बुडाल्याने दोन सख्या भावंडांसह बापलेकाचा मृत्यू झाला. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने सामनगाव (ता.जालना) गावावर शोककळा पसरली होती. घटनास्थळी व जिल्हा रूग्णालयात नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.
भागवत कृष्णा पडूळ (वय-१०), ओमकार कृष्णा पडूळ (०८), युवराज भागवत इंगळे (०९) आणि भागवत जगन्नाथ इंगळे (३८ सर्व रा. सामनगाव ता. जालना) अशी मयतांची नावे आहेत. जालना शहरापासून १० किलोमीटर अंतरावर सामनगाव हे गाव आहे. या गावातील कृष्णा पडूळ यांचे गावच्या शिवारात शेत आहे. त्यांच्या शेतात भागवत जगन्नाथ इंगळे हे सालगडी म्हणून काम करतात. भागवत इंगळे हे नेहमीप्रमाणे मंगळवारी शेतात कामाला गेले होते. सोबत त्यांचा मुलगा युवराजही होता. दुपारच्या सुमारास भागवत पडूळ, ओमकार पडूळ, युवराज इंगळे हे तीन मुलं शेतातील शेततळ्यावर गेली. शेततळ्यातील पाण्यात पोहण्यासाठी ते उतरले होते.
परंतु, पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. त्यांचा आवाज ऐकताच बाजूला काम करीत असलेले भागवत इंगळे यांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मुलांना वाचविण्यासाठी इंगळे हे ही शेततळ्यात उतरले. परंतु, त्या तीन मुलांसह भागवत इंगळे यांचाही तळ्यात बुडून मृत्यू झाला. बुडणाऱ्यांचा आवाज ऐकून शेततळ्यावर आलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ग्रामस्थांना आणि पोलिसांना माहिती दिली. काही युवकांनी शेततळ्यात उड्या घेवून मृतदेहाचा शोध घेणे सुरू केले. मृतदेह सापडत नसल्याने शेततळे एका बाजूने फोडण्यात आले हाेते. गावातील युवकांनी शेततळ्यातून त्या चौघांचे मृतदेह बाहेर काढले. तालुका ठाण्याचे सपोनि. खाडे, कर्मचारी मुंडे, मगरे, किशोर जाधव, ढाकणे यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मयतांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.
दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर
कृष्णा पडूळ यांना भागवत आणि ओमकार ही दोनच मुले होती. भागवत इंगळे हे पडूळ यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करत होते. त्यांना एकूण चार आपत्य आहेत. त्यापैकी युवराज इंगळे हे एक आपत्य होते. शेततळ्यात बुडून चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने पडूळ व इंगळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.