चार कुटुंबांचा आधार काळाने हिरावला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:41 AM2019-12-01T00:41:01+5:302019-12-01T00:41:12+5:30
औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती.
सुभाष शेटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवली : आई- बाप नसल्यानं पोराला तळताहाच्या फोडासारखं जपलं... साईबाबांच्या दर्शनाला जाण्याची परवानगी मागितली.. अगोदर जाऊ देऊ नये वाटलं... पण सार्इंचं नाव घेतल्यानं जाऊ दिलं... पण पोरगं देवा घरी गेलं.. असे सांगत मयत आकाश मोरे याचे आजोबा बबनाव मोरे शनिवारी सायंकाळी धायमोकलून रडत होते. औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ शनिवारी पहाटे झालेल्या कार अपघातात सेवली (ता. जालना) येथील चौघांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मयत चौघेही कुटुंबातील एकुलते एक मुलं होती. या मुलांचा अपघातीमृत्यू झाल्याने गावावर एकच शोककळा पसरली आहे.
जालना तालुक्यातील सेवली येथील अक्षय सुधाकर शीलवंत (१९), आकाश प्रकाश मोरे (१९), अमोल नंदकिशोर गव्हाळकर (१९), किरण संजय गिरी (१९), संतोष भास्कर राऊत (२०) या पाच युवा मित्रांनी शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला. शुक्रवारी रात्री जायचे आणि शनिवारी रात्रीपर्यंत परत यायचे असे नियोजन या मुलांनी केले होते. नाही- हो करीत पालकांनीही त्यांना परवानगी दिली. गावातीलच कार भाड्याने केली आणि गावातीलच चालक दत्ता वसंतराव डांगे (२३) हा वरील पाच मुलांना घेऊन शुक्रवारी रात्री शिर्डीकडे निघाला. मात्र, शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील गोलवाडी फाट्याजवळ कारला अपघात झाला. या भीषण अपघातात अक्षय शीलवंत, आकाश मोरे, अमोल गव्हाळकर व चालक दत्ता डांगे हे चार युवक ठार झाले. तर किरण गिरी व संतोष राऊत हे जखमी झाले.
चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनेने अवघे सेवली गाव हळहळले होते. कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांनी एकच टाहो फोडला होता.
कार अपघातातील मयत अक्षय शीलवंत हा १२ वी पास आहे. आई-वडिल नसलेल्या अक्षय व त्याची लहान बहीण आजी-आजोबांकडे राहतात. अक्षय चांगल्या प्रकारे मृदंग वाजवित होता. त्याचे काका बांगडीचा व्यवसाय करून त्याला शिक्षण देत होते.
आकाश मोरे याच्याही डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरवलेले आहे. तो एका लहान बहिणीसह आजोबा बबनराव मोरे व आजीजवळ राहत होता. आजोबांसोबत बाजारात शेव-चिवडा विकून तो शिक्षण घेत होता. बहिणीलाही शिक्षण देत होता. अक्षयच्या अपघाती निधनाने वृध्द मोरे दाम्पत्याच्या मनावर मोठा आघात झाला आहे.
१२ वी पास असलेल्या अमोल नंदकिशोर गव्हाळकर याचे वडील पंक्चरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दोन बहिणी व तो एकुलता एक मुलगा होता.
कार चालक म्हणून काम करणारा दत्ता डांगे याच्या वडिलांचे निधन झाले आहे. आई मंदिरात पुजारी म्हणून काम करते. दोन बहिणींचे लग्न झालेले आहे. एकुलता एक दत्ता हाच कुटुंबाचा आधार होता. सार्इंच्या दर्शनाला जाताना त्यांना परवानगी द्यावी की न द्यावी या अवस्थेत पालक होते. सार्इंच्या दर्शनाला जाणार असल्याने नकारही दिला नाही. मात्र, शुक्रवारी रात्री ९ वाजता घरातून निघालेल्या मुलांचा शनिवारी पहाटे २ वाजता मृत्यू झाला आणि चारही कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
अपघातातील जखमी किरण संजय गिरी याचे वडील शिवणकाम करतात. तर संतोष राऊत यांचे वडील सुतार काम करतात. दोघांच्या माता मजुरीस जातात. त्यांच्या उत्पन्नावरच घर चालते. मात्र, या अपघातात आपली मुलं गंभीर जखमी झाल्याचे कळाल्यानंतर त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली आहे. नातेवाईकांनी तातडीने रूग्णालयात धाव घेतली.
एकाच वेळी अंत्ययात्रा
अपघातातील मयतांचे मृतदेह शनिवारी रात्री गावात आणण्यात आले. युवकांचे मृतदेह येताच नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. मित्रपरिवाराचे डोळेही पाणावले होते. प्रत्येक जण हळहळ व्यक्त करीत होता. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास एकाच वेळी मयतांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.