जालन्यात विदेशी बनावटीचे चार पिस्टल जप्त; चौघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 03:06 PM2020-07-22T15:06:45+5:302020-07-22T15:08:48+5:30

पोलिसांनी चौकशी केल्यानंतर ही पिस्टल जळगाव भागातून विकत आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Four foreign-made pistols seized in Jalana; Four arrested | जालन्यात विदेशी बनावटीचे चार पिस्टल जप्त; चौघे जेरबंद

जालन्यात विदेशी बनावटीचे चार पिस्टल जप्त; चौघे जेरबंद

Next

जालना : अवैधरित्या विदेशी बनावटीचे पिस्टल विक्री करणाऱ्यासह चौघांना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून चार पिस्टलसह एक जीप जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री जालना शहरातील ढवळेश्वर भागात करण्यात आली.

जालना शहरातील ढवळेश्वर भागातील एक व्यक्ती अवैधरित्या पिस्टल विक्री करीत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांना मंगळवारी रात्री मिळाली होती. या माहितीवरून पथकाने ढवळेश्वर भागात राहणाऱ्या परमेश्वर अंभोरे याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान काही दिवसांपूर्वी चार पिस्टल विक्री केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. अंभोरे याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ढवळेश्वर भागातच राहणारा गणेश ज्ञानेश्वर काकडे याच्याकडून दोन, कृष्णा सलामपुरे याच्याकडून एक पिस्टल जप्त केले. तर रामदास उत्तम मिसाळ (रा. जानेफळ ता.भोकरदन) याच्याकडून एक पिस्टल जप्त करण्यात आले. 

या चौघांनाही पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्याकडून चार पिस्टल, एक जीप असा ७ लाख १० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरील आरोपींविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि प्रमोद बोंडले हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोनि शामसुंदर कौठाळे, पोउपनि प्रमोद बोंडले, पोना नंदलाल ठाकूर, कर्मचारी देवाशिष वर्मा, अनिल काळे यांच्या पथकाने केली.

जळगाव भागातून आणले पिस्टल 
परमेश्वर अंभोरे याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने ही पिस्टल जळगाव भागातून विकत आणल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ग्राहकांना मागणीनुसार त्याची विक्री करीत होता. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांपैकी दोघांवर यापूर्वीच काही गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, संबंधितांनी पिस्टल कोणत्या कारणाने खरेदी केली याचा तपास सुरू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी सांगितले.

Web Title: Four foreign-made pistols seized in Jalana; Four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.