चार ‘शिवशाही’तूून २३ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 01:04 AM2020-01-19T01:04:07+5:302020-01-19T01:04:36+5:30
जालना आगारात महिनाभरापूर्वी नव्याने चार शिवशाही (सिटर) बस दाखल झाल्या होत्या. महिनाभरात तब्बल २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
विकास व्होरकटे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना आगारात महिनाभरापूर्वी नव्याने चार शिवशाही (सिटर) बस दाखल झाल्या होत्या. या चारही बस नफ्यात आहेत. महिनाभरात या शिवशाही बसला तब्बल २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे, नेहमी बसेसमध्ये बदल केले जातात. पूर्वी महामंडळाद्वारे भाडेतत्त्वावर खाजगी कंपन्याच्या वातानुकूलित बसेस जालना विभागात सुरू करण्यात आल्या होत्या. मध्यंतरी महामंडळ व खाजगी कंपनीच्या काही बसचा करार संपला आहे. त्यामुळे विभागातील अनेक भाडेतत्त्वावरील शिवाशाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने स्वमालकीच्या शिवशाही सुरू केल्या आहेत.
डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी जालना आगारात चार शिवशाही दाखल झाल्या होत्या. यातील तीन बस पुणे मार्गावर सोडण्यात आल्या असून, एक बस नाशिक या मार्गावर आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे या चारही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
महिनाभरात चार शिवशाही बसने ६२ हजार ६३४ किलोमीटर अंतर पार केले आहे. यातून महामंडळाला २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसटी महामंडळाने आता खाजगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी विविध आधुनिक बसेस उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आता पुणे, मुंबईसह अन्य दूरच्या प्रवासासाठी एसटी महामंडळानेच प्रवास करणे पसंत करत असल्याचे दिसून येते.
दोन बस भाडेतत्त्वावर
जालना आगारात सद्यस्थितीत दोन शिवशाही स्लीपर बसभाडे तत्त्वावर चालविण्यात येत आहे. संबंधित बसला महामंडळातर्फे, चार किलोमीटरला एक लिटर डिझेल दिले जात असून, १५.७५ रूपये प्रति किलोमीटरने पैसे दिले जात आहे.
बसवर संबंधित कंपनीचा चालक असून, वाहन महामंडळाचा आहे. या दोन्ही बस कोल्हापूर मार्गावर महामंडळाकडून चालविल्या जात आहेत. मागील महिन्यात या बसचे अंतर ३१ हजार किलोमीटर झाले आहे. यातून महामंडळाला १३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.