जालना, अंबड आगारात प्रवाशांच्या दिमतीला चार नवीन ‘शिवशाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:56 AM2019-11-28T00:56:16+5:302019-11-28T00:56:42+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जालना विभागातील जालना व अंबड आगाराला प्रत्येकी दोन नवीन शिवशाही बसेस दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने जालना विभागातील जालना व अंबड आगाराला प्रत्येकी दोन नवीन शिवशाही बसेस दिल्या आहेत. प्रवाशांच्या दिमतीला चार नवीन वातानुकूलित बसेस दाखल झाल्या असून, महामंडळाच्या उत्पन्न वाढीस या बसेस लाभदायक ठरणार आहेत.
लांब पल्ल्याचा प्रवास करताना महामंडळाच्या बस ऐवजी खासगी बसेसकडे प्रवाशांचा अधिक कल दिसून येतो. खासगी बसमध्ये प्रवास करताना मिळणाऱ्या सोयी-सुविधा यास कारणीभूत ठरतात. याचा महामंडळाच्या आर्थिख उत्पन्नावर मोठा परिणाम होतो. मात्र, ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांना चांगल्यात चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून शिवशाही बसेसकडे पाहिले जाते. लाल परीमुळे राज्य परिवहन महामंडळाचा जालना विभागही नफ्यात आलेला आहे. गत वर्षी जालना विभागीय कार्यालयाला बसच्या माध्यमातून निव्वल चार कोटी ३२ लाख रूपयांचा नफा मिळाला होता.
मध्यंतरी एस.टी. महामंडाळाकडून खासजी तत्त्वावर काही शिवशाही बस चालविल्या जात होत्या. मात्र, आता महामंडाळाने वातानुकूलित ‘शिवशाही’ बसची बांधणी करण्याला सुरूवात केलेली आहे. यातील चार बस जालना विभागात आल्या आहेत. यातील दोन बस पंधरा दिवसांपूर्वी जालना आगारात दाखल झाल्या असून, दोन बस अंबड आगाराला देण्यात आल्या आहेत. जालना आगारातील बस जालना- पुणे या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. यातील एक बस सकाळी दहा वाजता जालना आगारात लागते. तर दुसरी बस रात्री दहा वाजता जालन्यातून पुण्याकडे रवाना होते. या दोन्हीही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे आगार प्रमुख पंडित चव्हाण यांनी सांगितले. उर्वरित दोन बस अंबड आगारात आहेत.
यातील एक बस अंबड येथून सकाळी ११ वाजता पैठण मार्गे पुण्याकडे रवाना होत आहे. दुसरी बस जालना- औरंगाबाद मार्गे पुण्याला जात आहे. या बसेसद्वारे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे.
विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बस जालना आगारात आठवडाभरात दाखल होणार आहेत. यापुढे दूरचा प्रवास प्रवाशांचा अधिकच सुलभ होणार आहे.