जालन्यात चार रूग्णांचा मृत्यू; बाधितांची संख्या ७०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 11:00 PM2020-07-05T23:00:58+5:302020-07-05T23:01:12+5:30
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे.
जालना : जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असलेल्या तीन पुरूषांसह एका महिला रूग्णाचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकाच दिवशी शहरातील चार रूग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे रविवारीच ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, जिल्ह्यातील बाधितांची संख्या तब्बल ७१९ झाली आहे.
जालना शहरातील ढवळेश्वर भागातील ४२ वर्षीय व्यक्तीस २७ जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर शहरातीलच गुरूगोविंदसिंग नगर भागातील ५० वर्षीय व्यक्ती, नाथबाबा गल्लीतील ६० वर्षीय व्यक्ती व गांधीनगर परिसरातील रहिवासी असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेस ३० जून रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. या चारही रूग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
एकीकडे चार रूग्णांचा बळी गेलेला असताना दुसरीकडे ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बाधितांमध्ये जालना शहरातील २७ जणांचा समावेश आहे. यात बुºहाणनगर भागातील सात, दानाबाजार भागातील पाच, कादराबाद भागातील दोन, जेईएस कॉलेज परिसरातील दोन, जेपीसी बँक कॉलनीतील चार, गांधीनगर भागातील दोन, क्रांतीनगर भागातील एक, भाग्यनगर मधील एक, सुवर्णकार नगर मधील एक, नळगल्लीतील एक, संभाजीनगर भागातील एकाचा यात समावेश आहे. तर भोकरदन शहरातील तुळजाभवानी नगर मधील एक, अंबड तालुक्यातील भालगाव येथील एक, दहिपुरी येथील एक, चुर्मापुरी येथील एक, परतूर तालुक्यातील शेवगव्हाण येथील एक, पडेगाव रामगोपालनगर येथील दोन अशा ३४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७१९ वर गेली असून, त्यातील २६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर यशस्वी उपचारानंतर ४१६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी पुढील दहा दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीस रविवारी मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी शहरातील विविध मार्गावरून रूटमार्च काढण्यात आला. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. रूटमार्चमध्ये जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, सीईओ निमा अरोरा यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. सूचनांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. शिवाय चौका- चौकामध्ये फिक्स पॉइंट करून पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला असून, शहरांतर्गत अनेक रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
१५ जणांना डिस्चार्ज
जिल्हा रूग्णालयातील यशस्वी उपचारानंतर कोरोनामुक्त झालेल्या १५ जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. यात वाल्मिक नगर येथील एक, गुडलागल्ली येथील एक, यशवंतनगर येथील एक, मंगळबाजार येथील एक, कोष्टी गल्लीतील एक, पानशेंद्रा येथील एक, नळगल्लीतील दोन, हकिम मोहल्ला येथील एक, क्रांतीनगर येथील एक, रहेमानगंज येथील एक, योगेशनगर येथील एक, सूर्यनानारायण चाळ येथील एक, बागवान मश्जिद येथील एक, भोकरदन येथील एक अशा एकूण १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मागील दहा दिवसांमधील स्थिती
दिनांक नवीन रूग्ण मृत्यू कोरोनामुक्त
२६ जून १८ ०० १४
२७ जून ३७ ०० १६
२८ जून ४२ ०० १९
२९ जून १७ ०० ००
३० जून ३३ ०२ १५
०१ जुलै २७ ०३ ०९
०२ जुलै ३९ ०१ ०८
०३ जुलै ३२ ०३ ११
०४ जुलै ३३ ०० २२
०५ जुलै ३४ ०४ १५
एकूण ३१२ १३ १२९