लूट प्रकरणी चार संशयित जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:56 AM2018-05-28T00:56:28+5:302018-05-28T00:56:28+5:30
औद्योगिक वसाहतीमधील लूट प्रकरणातील चार संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील औद्योगिक वसाहतीमधील लूट प्रकरणातील चार संशयितांना पकडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह सहा लाख रुपये जप्त केले आहेत.
औद्योगिक वसाहतीमध्ये २४ मे रोजी गिताई स्टील कंपनीचे व्यवस्थापक सनी गणेश चिलखा हे भाग्यलक्ष्मी स्टील कंपनीच्या मालकांकडून सहा लाख रुपये घेवून एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी चाकूचा धाक दाखवून चिलखा यांच्याकडी सहा लाख रुपये असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला होता. चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी लगेच तपास सुरू केला. भरदिवसा झालेल्या या प्रकारामुळे व्यापाºयांमध्ये भीतीचे वातावरण होते. या प्रकरणाचा तपासासाठी तीन पथके तयार करण्यात आली. दरम्यान, गौर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित आकालसिंग राजूसिंग जुन्नी (रा. जालना) याने साथीदारांच्या मदतीने लुटमार केल्याचे समोर आले. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, साहाय्यक उपनिरीक्षक रज्जाक शेख, भालचंद्र गिरी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, गोकळसिंग कायटे, प्रशांत देशमुख, विनोद गडदे, अंबादास साबळे, समाधान तेलंग्रे, रंजित वैराळ, विलास चेके यांनी ही कारवाई केली.
संशयित लुट प्रकरणातील रक्कम वाटून घेवून वेगवेगळ्या दिशेने निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तिन्ही पथकाने ३६ तास संशयितांचा शोध घेवून संशयित कपील उर्फ प्रकाश उर्फ पक्या सुंदरलाल जैन (३०) अर्जुन उर्फ धती किशोर धाकतोडे (२३), आकाश राजूसिंग जुन्नी (१९ , किशोर भास्करराव पडूळ (२४, दोघे रा. टीव्ही सेंटर, जालना) यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी औद्योगिक वसाहतीमध्ये लुटमार केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली ४० हजारांची दुचाकी रोख सहा लाख रुपये व एक खंजीर जप्त केले आहे. चौघांनाही मंगळवारपर्यंत दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.