जालन्यात चार प्रशिक्षणार्थींना परिचारिकांना पाण्यातून विषबाधा
By विजय मुंडे | Published: June 8, 2023 06:54 PM2023-06-08T18:54:53+5:302023-06-08T18:55:27+5:30
सध्या चौघींची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जालना : येथील शासकीय रूग्णालय परिसरातील नर्सिंग कॉलेजमध्ये असलेल्या चार प्रशिक्षणार्थी परिचारिकांना पाण्यातून विषबाधा झाली. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली असून, त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रूग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जालना येथील जिल्हा रूग्णालय परिसरात नर्सिंग कॉलेज आहे. येथील चार पैकी एका मुलीला बुधवारी सायंकाळी बॉटलमधील पाण्यात पाल पडल्याचे दिसून आले. ते पाणी पिलेल्या मुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्याचवेळी या कॉलेजमधील इतर तिघींनाही मळमळ, उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना तात्काळ उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. एका मुलीला उपचारानंतर डिश्चार्ज देण्यात आला असून, अनिता जाधव, रिया साळवे, वैष्णवी काळे या तिघींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका मुलीने बॉटलमधील पाणी पिले होते. तर इतर मुलींना भितीमुळे उलट्या, मळमळ झाल्या. चौघींचीही प्रकृती स्थिर असल्याचे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या पार्वती लोंढे यांनी सांगितले.