चार वर्षांपासून चिक्की गोदामात पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 01:01 AM2019-02-01T01:01:39+5:302019-02-01T01:02:25+5:30
घनसावंगी तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत २०१५ साली आलेली चिक्की चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनसावंगी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयाच्या गोदामात पडून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना या प्रकल्पांतर्गत २०१५ साली आलेली चिक्की चार वर्षापासून अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घनसावंगी येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या कार्यालयाच्या गोदामात पडून आहे. यामुळे शासनाचे १६ लक्ष रुपयांचे नुकसान झाले असून, संबधित अधिकाºयांवर कडक कारवाई करण्याची मागणी जि. प. सदस्य जयमंगल जाधव यांनी केली आहे.
जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना प्रकल्प १ व प्रकल्प २ मध्ये १३ फेब्रुवारी २०१५ च्या शासन निर्णयानुसार राजगिरा चिक्की पुरवठा करण्याचे आदेश शासनाने दिले होते. मुलांना पोषण आहार करण्यासाठी सिंधूदुर्ग येथील एका कंपनीने या चिक्कीचा पुरवठा केला होता. ७ जुलै २०१५ रोजी घनसावंगी कार्यालयात चिक्कीचा पुरवठा करण्यात आला. परंतु, ९ जुलै २०१५ रोजी ही चिक्की वाटप करु नये, अशी तक्रार विभागाला प्राप्त झाली होती. त्यानंतर या चिक्कीचे वाटप करण्यात आले नाही. याबाबत एकात्मीक बाल विकास सेवा योजनेच्या तत्कालीन तालुका अधिका-यांनी उप मुख्य कार्यकारी अधिका-यांना ४ आॅगस्ट रोजी पत्र लिहून मार्गदर्शन माघविले होते. परंतु, तत्कालीन उप मुख्य कार्यकारी अधिका-यांनी या पत्रावर कुठलीच कारवाई केली नाही. तेव्हापासून १६ लक्ष रुपयांची चिक्की आजपर्यंत कार्यालयात पडून आहे.