बनावट नोटा प्रकरणी चार वर्षाची सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:39 AM2019-04-17T00:39:31+5:302019-04-17T00:40:24+5:30
तब्बल सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जात एडीएसच्या पथकाने पकडलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (२३ रा. शारदा नगर अंबड) याला मंगळवारी जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ यांनी आज आरोपीला दोषी ठरवून चार वर्ष सक्त मजुरी आणि सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : तब्बल सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन जात एडीएसच्या पथकाने पकडलेला आरोपी शेख समीर शेख मुन्ना (२३ रा. शारदा नगर अंबड) याला मंगळवारी जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ यांनी आज आरोपीला दोषी ठरवून चार वर्ष सक्त मजुरी आणि सहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
सहा लाख रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने अंबडहून जालन्याकडे येत असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख यशवंत जाधव यांना गुप्त रीतीने मिळाली होती. एडीएसच्या पथकाने गोलापांगरी परिसरात सापळा लावून वर्णन केलेल्या इंडिका कार क्रमांक एम.एच. २१ ए.एक्स ०३२८ कारची झडती घेतली असता कारच्या डिकीमध्ये शंभर रुपयांच्या तब्बल ६ लाख १७ हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्याची घटना २४ एप्रिल २०१८ रोजी उघडकीस आली होती. यात आरोपी शेख समीर शेख मुन्ना याला कारसह ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याचा मित्र अन्वर देशमुख (रा.अंबड) याच्या सांगण्यावरुन बनावट नोटा चलनात आणण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याची कबुली पोलिसांना दिली होती. यावरून शेख समीर याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे अन्वर देशमुख हा औरंगाबाद येथे काही उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणात आरोपी आरोपी होता. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता होती. यात चौकशीनंतर दोषारोपपत्र दाखल होऊन हा निकाल न्यायालयाने दिल्याने खळबळ उडाली आहे.
एडीएसच्या पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करुन न्यायालयात मुदतीत दोषारोप दाखल केले होते. जालना येथील अतिरिक जिल्हा व सत्र न्यायाधीश -२ कोराळे यांनी मंगळवारी शेख समीरला दोषी ठरवून सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणी वकील पी.पी. मते, सरकारी वकील अॅड. विपुल देशपांडे यांनी बाजू मांडली.