लॉटरीतून फसवणूक; दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:56 AM2018-12-04T00:56:50+5:302018-12-04T00:57:07+5:30
जुना जालना भागातील भवानीनगरमध्ये बनावट लॉटरीच्या नावाने सुरू असलेले रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जुना जालना भागातील भवानीनगरमध्ये बनावट लॉटरीच्या नावाने सुरू असलेले रॅकेट स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. या लॉटरी सेंटर चालकासह अन्य एका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
भवानीनगर परिसरात बनावट लॉटरीच्या नावाखाली फसवणूक करून पैसे उकळले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यारून त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी भवानीनगरमध्ये रविवारी रात्री अचानक छापा मारला. त्यावेळी दोन संगणक जप्त करण्यात आले.
यावेळी संतोष बालाजी घाटगे या लॉटरी सेंटर चालकाला अटक केली. त्याने दिलेल्या माहिती नुसार टांगास्टँड भागातील रहिवासी सय्यद अलिम यांच्या सांगण्यावरून आपण सहा टक्के कमिशनवर हे सेंटर चालवित असल्याचे घाटगेने सांगितले. यात सय्यद अलिमने शुभलक्ष्मी ऐवजी राजलक्ष्मी लॉटरीचे बनावट सॉप्टवेअर डाऊनलोड करून हा व्यवसाय केला जात होता. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी सॅम्युअल कांबळे, समाधान तेलेंग्रे, कृष्णा तंगे, सदाशिव राठोड, सचिन चौधरी, विलास चेके यांनी प्रयत्न केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आणि अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.