आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष, सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील ९ लोकांना ५८ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2022 07:01 PM2022-06-12T19:01:40+5:302022-06-12T19:01:49+5:30
आरोपींनी उमेदवारांना खोटे नियुक्तीपत्र दिले, काही दिवस कामही करुन घेतले. पण, नंतर अधिकाऱ्यांमार्फत हे बनावट असल्याचे उघड झाले.
सिल्लोड: आरोग्य विभागात नौकरी लावून देण्याचे अमिष दाखवून सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील ९ लोकांना ५८ लाखात गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी ८ लोकांविरुद्ध रविवारी गुन्हे दाखल केले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नौकरीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या आरोपीचे नाव पंकज वामन कोल्हे उर्फ जैस्वाल(रा.आशीर्वाद अपार्टमेंट तिसरा मजला भगतनगर नागपूर), वराडे पूर्ण नाव माहीत नाही आरोग्य विभागातील अधिकारी पुणे, साळवे पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद जिल्हा यवतमाळ, पाटील पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद, राऊत पूर्ण नाव माहीत नाही, उपजिल्हा रुग्णालय पुसद, अरुण पाटील(टीव्ही सेंटर औरंगाबाद) व इतर दोन अशा आठ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी अंबादास उखाजी सोनुने (वय ४३ वर्षे) व्यवसाय शेती(रा.कोळी कोठा ता. भोकरदन जिल्हा जालना) यांच्याकडून १ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबरला वरील आरोपींनी ५८ लाख रुपये सिल्लोड शहरातील भराडी पेट्रोल पंपाजवळ घेतल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी दिली. अंबादास सोनुने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वरील आरोपींविरुद्ध ४२० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यातील फिर्यादी अंबादास सोनुने याना आरोपी पंकज वामन कोल्हे यांना, त्यांचे नातेवाईक उमेदवार याना आरोग्य विभागामध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचे मार्फत सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या पालकांकडून ५८ ,00,000 लाख रुपये घेतले.
खोटे नियुक्ती पत्र दिले
यातील आरोपी क्रमांक २ ते ५ यांच्या मदतीने उमेदवार मुलांचे आरोग्य विभागामध्ये खोटे नियुक्तीपत्र तयार करून फिर्यादी व त्यांचे नातेवाईक उमेदवार यांना देऊन उमेदवार यांचेकडून पुसद तसेच गुरुगोविंद सिंग जिल्हा रुग्णलाय नांदेड येथे हजर करून घेऊन एकमहिना, दीड महिना, ४० दिवस ९ उमेदवारांकडून आरोग्य सेवक म्हणून कामे करून घेतली.
असे फुटके बिंग...
उमेदवार मुलांना पर्मनंट ऑर्डर तुमच्या पत्यावर पाठवू असे आरोपी क्रमांक १ ते ८ यांनी सांगून उमेदवार मुलांना घरी पाठवले. ८ ते १० दिवसाच्या अंतराने उमेदवार मुलांना त्यांचे राहत्या घरी पत्यावर नियुक्ती पत्र पोस्ट द्वारे प्राप्तही झाले. त्यामध्ये उमेदवार मुलांना जिल्हा हिवताप अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांचेकडे हजर होणे बाबत आदेश असल्याने यातील उमेदवार जिल्हा हिवताप अधिकारी यवतमाळ यांचेकडे हजर झाले. पण तेथील अधिकारी यांनी सदर नियुक्तीपत्र पाहून ते बनावट असल्याचे सांगितले.
फिर्यादिस आपली व नातेवाईक मुलांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सोनुने यांनी आरोपी पंकज वामन कोल्हे यांना आमचे पैसे परत द्या अशी मागणी केली. पण, कोल्हे यांनी तुमचे दोन उमेदवारांचे ९ लाख रुपये आरोपी अरुण पाटील याच्याकडे जमा असल्याचे सांगितले. सोनुने यांनी त्यांना संपर्क केला असता पाटील याने फिर्यादीस ९ लाख रुपयांचा युको बँकेचा धनादेश दिला, मात्र तो चेक वटला नाही. आपली वरील लोकांनी फसवणूक केल्याची खात्री झाल्याने त्यांनी तक्रार दिली त्या वरून वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
मोठे रॅकेट...
आरोग्य विभागात नौकरी लावून देणारे मोठे रॅकेट असून त्याचा तपास सुरू आहे. सिल्लोड व भोकरदन तालुक्यातील फसवणूक झालेल्या सर्व उमेदवारांचे जाब जवाब घेतल्यावर ठीक ठिकाणी सापळा रचून आरोपीना अटक केली जाईल. यात मोठं मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
- अशोक मुदिराज पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर पोलीस ठाणे.