शेतकऱ्यांची करोडोची फसवणूक; ज्यादा पैसे देतो म्हणत उधारीवर शेतमाल घेऊन व्यापारी फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 01:07 PM2022-09-06T13:07:25+5:302022-09-06T13:07:42+5:30
पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले आहेत.
भोकरदन( जालना) : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील एका भुसार मालाच्या स्थानिक व्यापाऱ्याने शेकडो शेतकऱ्यांची जादा भावाचे आमिष दाखवीत करोडोंची फसवणूक केली आहे. शेतकऱ्यांकडून उधारीवर घेतलेला सोयाबीन, मका, हरबरा, कापूस असा कोट्यवधी रुपयांचा माल घेऊन व्यापारी फरार झाला असून याप्रकरणी पारध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनेश रामकिशन बालरावत ( रा.पिंपळगाव रेणुकाई) असे फरार व्यापाऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील व्यापारी दिनेश बलरावत याचे वडील व दोन भाऊ मागील अनेक वर्षापासून गावात भुसारचा व्यवसाय करतात. गावातील तसेच परिसरातील शेतकरी त्यांच्याकडे आपला शेतीमाल विकण्यासाठी जायचे. दिनेश शेतकऱ्यांना जादा भावाचे आमिष देत बिलाच्या कच्चा पावत्या बनवून देत शेतमाल खरेदी करत असे. त्यानंतर काही दिवसांनी ठरल्यानुसार पैसे द्यायचा. त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास बसला.
दरम्यान, यावर्षी देखील शेतकऱ्यांनी दिनेशला सोयाबीन, कापुस, मका, हरभरा आदी माल मुदतीवर विकला. पंरतु, मुदत संपवून देखील शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही. काही शेतकरी घरी गेल्यावर त्याच्या परिवाराकडून धमक्या देत उडवाउडवीचे उत्तरे देण्यात आली. मागील तीन ते चार महिन्यापासून दिनेश बलरावत हा गावातून गायब, त्याचा मोबाईल देखील बंद येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पैसा न मिळाल्याने यावर्षी खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना दुसरीकडे हात पसरावे लागले. काही शेतकऱ्यांच्या घरात देखील यावरून वाद सुरू झाले. अनेक शेतकरी मानसिक तणावात आहेत.
अखेर याप्रकरणी संतोष उल्हासराव देशमुख, संतोष गणेशराव देशमुख, संदीप सुभाषराव देशमुख, रामेश्वर विठ्ठलराव देशमुख, विठ्ठल गणेशराव देशमुख यांनी पारध पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दिली. यावरून व्यापारी दिनेशवर ४२०, ४०६ कलम अन्वये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दिलेल्या शेतकऱ्यांची जवळपास २५ लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. फसवणूक झालेले अन्य शेकडो शेतकरी देखील दिनेश बलरावत विरोधात पारध पोलीस ठाण्यात फसवणूकीची तक्रार देणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रमेश रुपेकर हे करीत आहेत.
शेतकऱ्यांनी जागरुक राहून व्यवहार करावा. खबरदारीने शेतमाला संदर्भात निर्णय घ्यावेत. आरोपीला कडक शासन होईल यासाठी.
- अभिजीत मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पारध पोलीस स्टेशन.