बनावट सोने देऊन नऊ लाखांची फसवणूक करणारा अटकेत
By दिपक ढोले | Published: May 28, 2023 05:24 PM2023-05-28T17:24:20+5:302023-05-28T17:26:10+5:30
नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
दीपक ढोले, जालना: बनावट सोने देऊन नऊ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला भोकरदन पोलिसांनी सिंदखेडराजा येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कैलास गंगाराम पवार (रा. असोला रोड, सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) असे संशयिताचे नाव आहे. भोकरदन येथील रहिवासी गजानन रामकिसन सहाणे यांची १८ मे रोजी बनावट सोने देऊन नऊ लाख रुपयांची फसवणूक झाली होती.
या प्रकरणात भोकरदन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी भाऊसाहेब जाधव, समाधान जगताप यांनी तपासाची चक्रे फिरवली. या गुन्ह्याचा पोलिसांनी सखोल तपास केला असता, एका व्यक्तीने सोने खरेदीसाठी मौजपुरी (जि. जालना) येथील एका व्यक्तीला फोन केला होता. यावरूनच भोकरदन पोलिसांनी मौजपुरी येथे जाऊन संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने संशयित कैलास पवार याचा फोन आल्याचे पोलिसांना सांगितले.
शिवाय, कैलास पवार याने सोने घेण्यासाठी सिंदखेडराजा येथे बोलाविल्याचेही तो म्हणाला. त्यानुसार पोलिस व काही खासगी व्यक्ती २७ मे रोजी सिंदखेडराजा येथे गेले. पोलिसांनी संशयित पवार याच्या फोनवर फोन करताच, त्याचा फोन वाजला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने पळवून जाण्याचा प्रयत्न केला. हल्ला करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला जेरबंद केले. कैलास पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर अनेक पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.