२२०० एचआयव्ही ग्रस्तांना मिळणार मोफत बसची पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:36 AM2019-01-10T00:36:45+5:302019-01-10T00:37:05+5:30
जिल्ह्यातील २,२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने काही दिवसांपूर्वीच एचआयव्ही बाधित रुग्णांना ये-जा करण्यासाठी मोफत पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २,२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार असून, लवकरच रुग्णांना ही पास देण्यात येणार आहेत.
राज्यात एचआयव्हीच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात आहे. या एचआयव्ही बाधित रुग्णांना दर महिन्याला औषधोपचाराकरिता उपजिल्हा, जिल्हा रुग्णालयात ये-जा करावी लागते. एचआयव्ही बाधित रुग्णांना ये-जा करण्यासाठीच जास्त खर्च लागतो. या रुग्णांचा खर्च कमी करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मोफत बस पास देण्यात येणार आहे. या रुग्णांना दर महिन्याला ५० कि.मी.पर्यंत या पासने जाता येईल.
जालना जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २२०० एचआयव्ही बाधित रुग्णांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. यात १७७ बालके, १०५२ पुरुष, ९९५ महिलांचा समावेश आहेत. दरम्यान, लवकरच या रुग्णांना ही पास उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
५० किलोमीटरच करता येणार प्रवास
एचआयव्ही बाधित रुग्णांना दर महिन्याला तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी औषधोपचारासाठी यावे लागते. याचे अंतर ४० ते ५० किलो मीटर असल्यानेच या योजनेचा ५० किलोमीटरचा प्रवास ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातील औषधोपचार केंद्रे
जालना जिल्ह्यात एचआयव्ही ग्रस्तांसाठी पाच औषधोपचार केंद्रे आहेत. अंबड, परतूर, मंठा, घनसावंगी, भोकरदन तालुक्यांमध्ये औषधोपचार केंद्रे असल्याचे शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला असून, याबाबत आम्ही विभाग नियंत्रकांना पत्र देणार असल्याचे जिल्हा पर्यवेक्षक राजेश गायकवाड, जिल्हा सहायक कार्यक्रम अधिकारी विलास कांबळे यांनी सांगितले.