क्वारंटाइन असलेल्या शहरात मुक्तसंचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:42 AM2021-02-27T04:42:04+5:302021-02-27T04:42:04+5:30
देऊळगाव राजा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यांसह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...
देऊळगाव राजा : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यांसह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात ५५ ते ६० जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे, परंतु क्वारंटाइन असलेल्यांचा शहरात मुक्तसंचार सुरू आहे. यामुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
मागील काही दिवसांपासून तालुक्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने १ मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. सर्व कार्यालयात १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थित बंधनकारक करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची मालवाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू राहणार आहे, तर मंदिरांमध्ये १० नागरिकांना एका वेळी प्रवेश देऊन सुरू राहणार आहेत. प्रशासनाने निर्बंध कडक केले असतानाही शहरात गृहविलगीकरणामध्ये असलेले रुग्ण शहरात फिरताना दिसत आहेत. त्यामुळेच रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. क्वारंटाइन केलेल्यांच्या हातावर शिक्के मारण्याची मागणी होत आहे. तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांनी दीड हजारांचा आकडा पार केला आहे, तर कोरोनामुळे नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला.