खाद्यतेलाचा वारंवार वापर हा तर गुन्हा; होऊ शकतो कॅन्सर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:35 AM2021-09-24T04:35:42+5:302021-09-24T04:35:42+5:30
जालना : बाहेर ठिकठिकाणी तळले जाणारे चटकदार पदार्थ तेलाचा पुनर्वापर करून तळले जातात. असे पदार्थ सातत्याने खाण्यात आले तर ...
जालना : बाहेर ठिकठिकाणी तळले जाणारे चटकदार पदार्थ तेलाचा पुनर्वापर करून तळले जातात. असे पदार्थ सातत्याने खाण्यात आले तर कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे बाहेरील तळलेले चटकदार पदार्थ खाण्याचा मोह टाळण्याची गरज आहे.
पूर्वी घाण्याचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरले जात होते. परंतु, हळूहळू रिफाइंड तेलाचा वापर वाढला आहे. तेलाचा वाढता वापर तेलाचे दरही गगनाला घेऊन गेला आहे. ठिकठिकाणची हॉटेल, धाब्यांसह हातगाड्यांवर विविध पदार्थ तेलामध्ये तळले जातात. हे पदार्थ तळलेल्या तेलाचा पुनर्वापर करणे कायदेशीर गुन्हा असून, अन्न प्रशासनाकडून कारवाई केली जाऊ शकते. विशेषत: ह्रदयाशी संबंधित आजारही अशा खाद्यपदार्थांमुळे बळावू शकतात. अशा गंभीर आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी बाहेरील विशेषत: एकाच तेलात वेळोवेळी तळले जाणारे पदार्थ खाणे टाळणे अधिक चांगले.
रस्त्यावर न खाल्लेले बरे
रस्त्यावर भज्यांसह इतर विविध पदार्थ तळणारे अनेकजण एकाच तेलाचा पुनर्वापर करतात.
तेलाचा पुनर्वापर झाल्याने तेलामध्ये ट्रान्सफॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते.
अशा तेलातील खाद्यपदार्थ कॅन्सरसह ह्रदयाशी संबंधित आजाराला कारणीभूत ठरतात.
तेलाचा पुनर्वापर आरोग्याला घातक
खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे तेलाचा पुनर्वापर करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. तेलाचा पुनर्वापर होत असल्याने तेलामध्ये ट्रान्सफॅटी ॲसिडचे प्रमाण वाढते. तेलाचा सातत्याने पुनर्वापर होत असेल तर शरीरातील काेलेस्ट्रॉल वाढून हृदयाशी संबंधित आजार होतात. शिवाय मूत्रपिंडासह कॅन्सरसारखा जीवघेणा आजारही होऊ शकतो.
डॉक्टरांचा सल्ला
बाहेरील, उघड्यावरील खाद्यपदार्थ शरीरासाठी घातक असतात. तेलकट पदार्थ किंवा तेलात तळले जाणारे पदार्थ सातत्याने खाण्यात आले तर कॅन्सरसारख्या आजारासह इतर गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
- डॉ. आशिष राठोड
अधिक तेलकट पदार्थ खाण्याचा मोह टाळणे गरजेचे आहे. विशेषत: बाहेरील किंवा उघड्यावरील तेलकट किंवा एकाच तेलात अधिक तळलेले पदार्थ खाणे टाळावे. असे खाद्यपदार्थ खाण्यात आले तर हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते.
- डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक
... तर होईल कारवाई
पदार्थ तळलेले तेल पुन्हा पदार्थ तळण्यासाठी वापरणे कायदेशीर गुन्हा आहे. अशा पद्धतीने तेलाचा वारंवार वापर केला तर मानवी शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे व्यावसायिकांनी तेलाचा पुनर्वापर करणे टाळावे. जे व्यावसायिक पदार्थ तळलेल्या तेलाचा पुनर्वापर करून इतर पदार्थ तळून तयार करीत असतील अशांवर कारवाई केली जाईल, असे अन्न प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अन्न प्रशासनाने कारवाई करणे गरजेचेच..
शहरासह जिल्ह्यातील विविध भागातील हॉटेल, धाब्यांसह हातगाडे चालक वापरीत असलेल्या तेलाची अन्न प्रशासनाने पडताळणी करणे गरजेचे आहे.
जे व्यावसायिक त्याच त्याच तेलाचा पुनर्वापर करीत असतील अशांवर दंडात्मक कारवाईचे सत्र राबविणेही गरजेचे आहे.