शुक्रवारी दिवाळी पहाटचा कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:58 AM2019-10-23T00:58:26+5:302019-10-23T00:58:58+5:30
संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील संस्कृती मंचच्यावतीने मुंबई आणि पुणे येथील धर्तीवर जालन्यातही दिवाळी पहाट या विशेष संगीत मैफलीचे आयोजन केले जात आहे. यंदा ही संगीत मैफल शुक्रवार दि. २५ आॅक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात होणार आहे. यावेळी नगर येथील प्रसिध्द गायिका अंजली आणि नंदिनी गायकवाड या बहिनी मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपटांचे गीत सादरीकरण करतील.
गायकवाड भगिनींनी यापुर्वी विविध वाहिन्यांवरुन प्रसिध्द होणाऱ्या संगीतविषयक कार्यक्रमात मोठी भरारी घेतली आहे. जालनेकरांना त्यांच्या या संगीताची मेजवानी मिळावी म्हणून संस्कृती मंचच्यावतीने त्यांना निमंत्रीत केले आहे. गेल्या बारा वर्षापासून या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले जात असून आतापर्यत या दिवाळी पहाट कार्यक्रमात पंडीत अजित कडकडे, पंडीत राजा काळे, प्रसिध्द किर्तनकार आफळे गुरुजी, मंदार आपटे, संपदा गोस्वामी, अनिकेत जोशी आदींनी हजेरी लावली आहे. हा संगीतविषयक कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आहे.
सदर संगीत मैफल मोफत असलीतरी रसिकांनी येतांना सोबत प्रवेश पत्रिका आणणे बंधनकारक केले आहे. या प्रवेश पत्रिका हॉटेल मधुबन, आरती डेली निड्स, पुजा डेली निड्स येथे उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती संस्कृती मंचच्यावतीने देण्यात आली आहे.
जे.जे. स्कुल या नामांकित संस्थेत विद्यार्थी असलेले योगेश लहाने आणि महेंद्र इंगोले तसेच संदीप आहेर यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या अदभूत, रम्य चित्रांचे प्रदर्शन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजिण्यात आले आहे.