मार्चअखेरपर्यंत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे : नरेंद्र पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 12:12 AM2019-02-09T00:12:04+5:302019-02-09T00:12:43+5:30
बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठा समाजातील तरुणांनी त्यांच्या पायावर उभे राहावे. तरुणांनी स्वत:चा उद्योग-व्यवसाय उभारुन उद्योजक व्हावे, या दृिष्टकोनातून महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. बँकांना या महामंडळांतर्गत देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केल्या.
महामंडळाच्या कर्ज, व्याज परताव्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व बँकर्स व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
शुक्रवारी घेण्यात आली. त्याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, रामेश्वर भांदरगे, जगन्नाथ काकडे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एन.व्ही. आघाव, महामंडळाचे जिल्हा समन्वयक उमेश कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने यावर्षी संपूर्ण राज्यात ५० हजार प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
जालना जिल्ह्याला ३ हजार प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यातील बँकांना देण्यात आलेले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्यात यावे. लाभार्थ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेकडून टाळाटाळ केली जातअसल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. मराठा समाजातील तरुणांच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्या प्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवत ही योजना प्रभावीपणे राबविण्यावे निर्देश यावेळी पाटील यांनी दिले.