राम मंदिर उभारणीसाठी १३ कोटींच्या निधीचे संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:59+5:302021-03-01T04:34:59+5:30
रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले की, संपूर्ण देशभर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधीचे संकलन केले ...
रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले की, संपूर्ण देशभर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधीचे संकलन केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यातही समर्पण निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली होती. याचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक घनश्याम गोयल हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास सर्व गावांमध्ये रामभक्तांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मंदिर उभारणीसाठी देणगी स्वीकारली आहे.
यात हिंदू धर्मातील सर्व जातींचे नागरिक आणि रामभक्त सहभागी झाल्याचे जयमंगल जाधव म्हणाले. अयोध्येत होऊ घातलेले भव्य राम मंदिर उभारणीसाठी एक हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे मंदिर उभारताना प्रत्येक रामभक्ताचा त्यात अर्थपूर्ण खारीचा वाटा असावा, या हेतूने ही समर्पण देणगी स्वीकारण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जालन्यातील दानशूर व्यापारी, उद्योजकांसह सामान्यातील सामान्य रामभक्तानेदेखील आपल्या ऐपतीप्रमाणे ही देणगी मनाेभावे दिल्याचे सांगण्यात आले. राम मंदिर उभारणीसाठी पथनाट्यांच्या माध्यमातूनही जागृती करण्यात आली.
या निधी संकलनासाठी येथील सर्व रामभक्त तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गोयल, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष घनश्याम गाेयल, उपाध्यक्ष जयमंगल जाधव, नितीन अग्रवाल, मनोहर खाकरे, प्रशांत नवगिरे, बालाजी वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेंद्र कळकटे आदींनी परिश्रम घेतले.