पथकाच्या अहवालानंतर मिळणार पुढील मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:59 AM2018-05-17T00:59:24+5:302018-05-17T00:59:24+5:30

मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत.

Further help after the team's report | पथकाच्या अहवालानंतर मिळणार पुढील मदत

पथकाच्या अहवालानंतर मिळणार पुढील मदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन/सिपोरा बाजार : जिल्ह्यात मागील वर्षीच्या खरीप हंगामात गुलाबी बोंडअळीमुळे कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले होते, या नुकसानीची मदत म्हणून राज्य सरकारने पहिला हप्ता शेतकऱ्यांना देऊ केला आहे. मात्र या नंतरच्या मदतीचे दोन हप्ते हे केंद्रीय पथकाच्या अहवालानंतरच मिळणार आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पथकाने बुधवारी भोकरदन तालुक्यात दौरा करून शेतक-यांची चर्चा केली.
बोंड अळीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसाठी राज्यशासनाने २६३ कोटी रुपयांचा मदत निधी मंजूर केला आहे. यातील ७३ कोटी ४३ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. ऐन खरीप हंगामाच्या सुरुवातीला मदत मिळणार असल्याने शेतक-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
जिल्ह्यात मागील वर्षी पाच लाख २८ हजार ८७३ शेतक-यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशी पिकाचे गुलाबी बोंडअळीमुळे नुकसान झाले होते. त्यामुळे कापूस उत्पादनावर परिणाम झाल्याने शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. राज्यात तीन हजार ४८४ कोटी रुपयांची नुकसान भरपाई रक्कम शेतक-यांना दिली जाणार आहे. तीन समान हप्त्यांमध्ये मदत निधीचे वाटप केले जाणार आहे. जालना जिल्ह्यासाठी २६३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ७३. ४३ लाखांचा मदत निधी प्राप्त झाला आहे.
बुधवारी या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजारसह अन्य गावांना भेटी दिल्या.
यावेळी त्यांनी शेतकºयांशी संवाद साधून अडचणी समजावून घेतल्या. या पथकात
केंद्रीय पथकाचे सचिव आश्विनीकुमार जौहरे, एस.पी. सिंह, कृषी आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांचा समावेश होता. पथका सोबत अप्पर जिल्हाधिकारी प्रकाश खपले, तहसीलदार योगिता कोल्हे यांच्यासह सरपंच विजय कड, उपसरपंच शहेजाद मिर्झा, माजी जि.प. सदस्य शिवराम कड, ग्रा.पं. सदस्य अरूण चव्हाण, सोरमारे, मंडळ अधिकारी डिघे, तलाठी रामेश्वर कांबळे आदींची उपस्थिती होती.
जालना : पथकाने केली शेतक-यांशी सविस्तर चर्चा...
पथकाने सर्व प्रथम भोकरदन तालुक्यातील बाभुळगाव व सिपोरा बाजार या गावांना भेट दिली. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील बोरगाव या गावाला भेट देऊन शेतक-यांशी संवाद साधला. भोकरदन, जाफराबाद भागात कापसाची मोठया प्रमाणात लागवड करण्यात येते. परंतु बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापूस पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याची माहिती तिन्ही गावातील शेतक-यांनी केंद्रीय पथकाला दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील शेतक-यांकडून त्यांनी किती एकरावर कापसाची लागवड केली होती, किती उत्पन्न झाले, कापूस पिकाला बोंड अळीचा प्रादुर्भाव कधी झाला, कोणत्या औषधाची फवारणी केली, विमा उतरवला होता काय आदी बाबींची माहिती जाणून घेतली.

Web Title: Further help after the team's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.