देशाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:33 AM2019-02-08T00:33:44+5:302019-02-08T00:34:07+5:30
योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाटूर : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशाचे भवितव्य शेतकºयांच्या हाती आहे. खरा भारत दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर छोट्या खेड्यांमध्ये वसतो. योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी गुरुवारी परतूर तालुक्यातील वाटूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
वाटूर येथे आर्ट आॅफ लिव्हींगच्या आतंरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी मेळावा, महासत्संग, प्रोजेक्ट भारत प्रतिनिधी सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की, रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज आहे. शेतक-यांच्या अनेक समस्यांचे समाधान रसायनमुक्त शेतीमध्ये असून, झिरो बजेट रसायनमुक्त शेती करणा-या शेतक-यांना बाजारपेठ मिळेल की नाही अशी काहींना शंका वाटते. रसायनमुक्त शेती करणा-या कोणत्याही शेतक-याने चिंता करू नये. अशा शेतक-यांचा सर्व शेतीमाल आम्ही आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून खरेदी करू. गाव मजबूत व बळकट करण्यामध्ये जातीयवाद व गटातटाचे विविध वाद अडचण आणतात. महाराष्ट्राला मोठी समृद्ध संत परंपरा लाभली असून, या संत परंपरेने निर्माण केलेली भक्तीलाट पुन्हा एकदा वाहण्याची गरज असून, ही भक्ती लाटच सर्व जातीयवाद, विविध गटांच्या वादावरील रामबाण इलाज आहे. भक्तीची शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले आत्मबल येण्यासाठी योग, प्राणायाम व ध्यान यांची उपासना अत्यावश्यक असल्याचेही शेवटी ते म्हणाले.