खेळाकडे करिअर म्हणून पाहावे - गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:37 AM2020-01-22T00:37:03+5:302020-01-22T00:37:57+5:30
विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास होतोच; शिवाय करिअर म्हणून खेळल्यास अव्वल खेळाडूंची प्रशासनात उच्च पदांवर नियुक्ती होते. खेळाडूंसाठी अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थी दशेत खेळाकडे करिअर म्हणून पाहावे, असे मार्गदर्शन प्राचार्य डॉ. बी. आर. गायकवाड यांनी दिला.
अंबाजोगाई येथे १ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत होत असलेल्या राज्यस्तरीय कुमार-कुमारी अजिंक्य निवड चाचणी करिता जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्ह्याचा संघ निवडीसाठी मंगळवारी अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रांगणात निवड चाचणीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय पाटील, प्रा. रमेश भुतेकर, शांतीलाल राऊत, डॉ. संजय शेळके, डॉ. भुजंग डावकर, आयोजक बी. जे. पाटोळे, प्रा. सुभाष देठे, संजय येळवंते, राजाभाऊ थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, खेळातून निर्णय क्षमता वाढीस लागते. तसेच मित्रत्वाची भावना वृध्दिंगत होत असून, सांघिक भावनेतून खेळाडूंनी राज्यात जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन रवींद्र ढगे यांनी केले. शांतीलाल राऊत यांनी आभार व्यक्त केले. निवड चाचणीत जिल्हाभरातील २० संघातील २०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून बाद पध्दतीने १९ सामने खेळविण्यात येत आहेत. पंच म्हणून बाबासाहेब मंडाळे, परमेश्वर जाधव, गणेश ढगे हे काम पाहत असून, जिल्हा निवड समितीत रवींद्र ढगे, अंबादास गिते, पंजाब वाघ, विठ्ठल दिवटे यांचा समावेश आहे.