आजपासून रंगणार डाव-प्रतिडावांचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:42 AM2018-12-19T00:42:53+5:302018-12-19T00:42:57+5:30
जालना शहरात २००२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहरात २००२ नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचा थरार रंगणार आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या या कुस्ती स्पर्धेची आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. या स्पर्धेत बुधवारी सकाळी प्रारंभी मल्लांचे वजन आणि वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन दुपारी तीन वाजेनंतर कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होणार असल्याचे सांगण्यात आले.
एकूणच जालन्यात होणाºया स्पर्धेसाठी राज्यभरातून ४५ संघ सहभागी होणार असून, त्यात ९०० मल्लांचा समावेश राहणार आहे. तर कुस्तीचे पंच आणि कुस्ती महासंघाचे पदाधिकारी तसेच अन्य तांत्रिक कर्मचारी मिळून एक हजार २०० जण जालन्यात दाखल झाले आहेत, तर काही संघ हे बुधवारी सकाळी येणार आहेत. जालन्यात कुस्तीची मोठी आवड ही पूर्वीपासूनच आहे. जालन्यातील स्व. चरण पहेलवान, रूपा पहेलवान, भरत पहेलवान यांची नावे प्रामुख्याने घ्यावी लागतील विशेष करून कुस्तीची आवड आणि ती जोपासण्यासाठी येथील अहिर गवळी आणि महाराष्ट्रीय गवळी समाजाचा सिंहाचा वाटा आहे.
पूर्वी जालन्यातील बहुतांश भागात लाल मातीचा हौदा असलेल्या तालीम होत्या. मात्र आता त्या तालीमची जागा अत्याधुनिक जीमने घेतली आहे. पूर्वी तालीम उभारणीसाठी शासनाकडून अनुदान मिळत होते, ते आता बंद झाले असून, अत्याधुनिक जीम उभरण्यासाठी आता अनुदान मिळत आहे. एकूणच लाल मातीतील कुस्ती गादीवर घेण्याची पाश्चिमात्य देशातील पध्दत भारतातही रूजू झाली आहे. आॅलिप्पिंक स्पर्धेत गादीवरीलच कुस्ती खेळली जात असल्याने त्याला मोठे महत्व आले आहे.
असे असले तरी महाराष्ट्र कुस्तीगिर संघटनेने माती आणि गादीवरील कुस्तींना समान संधी देऊन एक प्रकारे आधुनिक आणि लाल मातीतील कुस्तीला टिकवून ठेवली आहे.
आझाद मैदानावर होऊ घातलेल्या या कुस्तीसाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली असून, जागोजागी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यामुळे शहरात उत्साही वातावरण आहे.
जालन्यात पाच दिवस होऊ घातलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा म्हणजे पहेलवानांसाठी मोठी पर्वणी असते. यात प्रत्येकालाच विजय मिळेल असे नाही, परंतु आपल्यातील चपळतेने समोरच्या पहेलवानाला अस्मान दाखविण्यासाठी प्रत्येकजण तयारीला लागल्याचे दिसून आले. येथील डॉ. दयानंद भक्त महाविद्यालय परिसरात मंगळवारी फेरफटका मारला असता, जालना जिल्ह्यातील कुस्ती संघातील मल्ल आपली जोर आजमाईश करताना दिसून आले.
या स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. यू ट्यूबवरून या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे जवळपास ५५ देशात थेट प्रक्षेपण करण्यासाठीची उपाययोजना संयोजकांनी केली असून, या संदर्भात स्वागताध्यक्ष राज्यमंत्री अर्जुन खोतकर तसेच डॉ. दयानंद भक्त, लक्ष्मण सुपारकर, गणेश सुपारकर यांच्यासह संजय खोतकर, संतोष मोहिते यांनी भेट देऊन सायंकाळी पाहणी केली. तसेच प्रक्षेपणा संदर्भात संजय खोतकर यांनी सांगितले की,महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन ती परदेशातील कुस्ती प्रेमींनाही दिसावी हा यामागिल हेतू असल्याचे सांगण्यात आले.