गांधीजी हीच भारताची खरी ओळख...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:35 AM2018-02-15T00:35:59+5:302018-02-15T00:36:03+5:30
संपूर्ण जगात भारताची ओळख फक्त गांधीजी हीच आहे. गांधीजी हाच आमचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील डॉ. विश्वजित रॉय यांनी केले.
जालना : संपूर्ण जगात भारताची ओळख फक्त गांधीजी हीच आहे. गांधीजी हाच आमचा खरा ब्रँड असल्याचे प्रतिपादन ओडिशा येथील डॉ. विश्वजित रॉय यांनी केले.
येथील जेईएस महाविद्यालयातील महात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने आयोजित १४ व्या राज्यस्तरीय गांधी विचार अभ्यास शिबिरात सकाळच्या सत्रात ‘गांधी कोण होते ?’ या विषयावर ते बोलत होते.
ते म्हणाले की, संपूर्ण जगात भारताची ओळख गांधी हीच आहे. जगातील प्रत्येक देशात तेथील गांधी तयार झाले आहेत. अनेक देशांच्या महापुरूषाचे आदर्श गांधी आहेत. गांधी ही एक व्यक्ती नसून तो एक विचार आहे. संपूर्ण विश्व या विचाराकडे आशावादी नजरेने पाहत आहे. म्हणूनच युनोने गांधी जयंती विश्वशांती दिवस म्हणून घोषित केला आहे. जगाला आपल्या आचरणातून गांधींनी आदर्श दिला म्हणून मार्टिन ल्यूथर किंंग, बराक ओबामा, आँग-सांस-की अशा किती तरी लोकांचा आदर्श गांधीच आहेत. गांधींनी शत्रूंवरही तेवढेच प्रेम केले, जेवढे मित्रांवर केले. म्हणूनच त्यांना ज्यांनी जास्त त्रास दिला तो जनरल स्मट्स या इंग्रज अधिका-याला गांधींनी भेट दिलेली चप्पल तो पायात न घालता डोक्यावर घेऊन फिरला. गांधींचे जीवन प्रचंड आव्हानात्मक होते. त्यावेळी इंग्रज शत्रू होते; मात्र आज तरूणांसमोर विषमता हे मोठे आव्हान आहे. देशातील वाढत चाललेली आर्थिक विषमता, गरिबी हे संपविण्याचे आव्हान आहे आणि हे गांधी विचारांनी पूर्ण होऊ शकते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
यावेळी डॉ. उद्धव थोरवे, डॉ. राजक्रांती वलसे, डॉ. प्रतिभा श्रीपत, प्रा. पल्लवी भावसार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. महावीर सदावर्ते यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. प्रवीण चंदनशिवे यांनी मानले.