गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 12:23 AM2019-09-09T00:23:27+5:302019-09-09T00:23:56+5:30
शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करताना प्रथम त्या मंडळांनी न्यास नोंदणी कार्यालयाकडे रीतसर अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. या अंतर्गत जालन्यातील जवळपास १८० गणेश मंडळांनीच ही परवानगी घेतल्याचे दिसून आले. असे असले तरी आता वर्गणीचा हिशोब नीट ठेवून, शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या काही वर्षापासून न्यास नोंदणी कायद्या अंतर्गत गणेश मंडळांना परवानगी घेणे आणि हिशोब नीट ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब गंभीर आहे.
आता गणेश उत्सवाची सांगता होत आहे. परंतु भविष्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशाची स्थापना करण्यापूर्वी न्यास नोंदणी विभागाची परवानगी तसेच हिशोबाचा ताळेबंद सादर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
जालन्यात जवळपास १८० गणेश मंडळांनी परवागी घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच राज्याच्या अन्य भागात पूराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या भागातील गरजूांना आजही मदतीची गरज आहे. ही मदत माणूसकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येणार असल्याने गणेश मंडळांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन येथील सहायक धर्मदाय आयुक्त एस.बी माने आणि कार्यालयीन अधीक्षक आर.डी. पांचाळ यांनी यांनी केले आहे.