Ganesh Visarjan : जालन्यात गणपती विसर्जन करताना तिघांचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:35 PM2018-09-24T16:35:35+5:302018-09-24T16:38:03+5:30
शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला.
जालना : शहरातील मोती तलावात गणेश विसर्जन करतांना तिघांचा पाण्यात बुडून मूत्यू झाला. ही घटना रविवारी पाचवाजेच्या सुमारास घडली. अमोल संतोष रणमुळे (१७, लक्ष्मीनारायणपुरा), निहाल खुशाल चौधरी, शेखर मधुकर भदनेकर ( दोघे रा. लक्कडकोट) अशी मृतांची नावे आहेत.
रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अमोल रणमुळे हा आपल्या मंडळासोबत गणपती विसर्जनासाठी मोती तलाव येथे आला. विसर्जनासाठी तो पाण्यात गेला असता, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. गणपती विसर्जन झाल्यानंतर मंडळातील सर्व सदस्य परतले. परंतु, त्यांना अमोल दिसला नाही. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी अमोलचा शोध घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी अमोलला मृत घोषित केले.
या घटनेनंतरच निहाल चौधरी, शेखर भदनेकर हे दोघे विसर्जनासाठी गेले होते. त्यांनाही पाण्याचा अंदाज न आल्याने ते ही पाण्यात बुडाले. दोघांनाही नागरिकांनी पाण्याबाहेर काढुन रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान, सोमवारी तिघांच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यानंतर माजी आमदार कैलास गोरट्याल यांनी मयतच्या कुंटुबास प्रत्येक दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. परंतु, याला निहाल चौधरी व शेखर भदनेकर यांच्या नातेवाईकांनी विरोध करत नगरपालिकेसमोर मृतदेह आणून कुंटुबातील एक व्यक्तीस नगरपालिकेत नोकरी व मदत म्हणून प्रत्येक २५ लाख रुपये देण्याची मागणी केली.
चौकशी करणार
घटनेची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना करून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी