गॅस सिलींडरचा स्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:30 AM2019-06-16T00:30:56+5:302019-06-16T00:31:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव सपकाळ : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव सपकाळ : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ही घटना शनिवारी सकाळी भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे घडली. या घटनेत लाखोचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने घरी कोणी नसल्याने जीवित हानी टळली.
जळगाव सपकाळ येथील प्रभाकर सपकाळ हे कुटुंबासह शेतात राहतात. शनिवारी सकाळी ते कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. सकाळी ११ ते १२ वाजण्याच्या सुमारास सपकाळ यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट होऊन आग लागली. मोठा आवाज होऊन आग लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सपकाळ यांच्या घराकडे धाव घेतली.
उपस्थित जमावाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सपकाळ यांच्या घरातील धान्य, कपडे, शेतातील पेरणीसाठी साठवून ठेवलेले खते, बियाणे आदी लाखो रूपयांचे साहित्य जळून खाक झाले. या घटनेत जवळपास तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. प्रशासनाने या घटनेचा पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.