कर्त्या तरूणाच्या खुनामुळे गवळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:24 AM2018-12-10T00:24:16+5:302018-12-10T00:24:30+5:30
पावडे आणि राजपूत यांनी ज्ञानेश्वरला लोखंडी रॉडने मारहाण केली. रॉडचे घाव वर्मी लागल्याने त्यातच ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वालसावंगी : गावात दुष्काळी स्थितीमुळे हाताला काम मिळणे अवघड झाल्याने पुणे येथे जाऊन घरासाठी काही तरी करण्यासाठी ज्ञानेश्वरने चक्क हॉटेलमध्ये नोकरी स्वीकारली. ज्ञानेश्वरचे शिक्षण १२ वी पर्यंत झाले होते. महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर अंकुश गवळी हा पुणे येथे कामाच्या शोधात गेला होता. तेथे काम तर मिळालेच परंतु राहण्याची व्यवस्थाही झाल्याने तो खुश होता. पुण्यात कसेतरी आपले बस्तान बसल्याचे तो ज्यावेळी कु टुंबांशी मोबाईलवरून बोलत होता. तेव्हा तो आनंदात होता. थोडे बरे चालले असे सांगून आईला आणि घरातील भाऊ, बहिणीला दिलासा देत होता. परंतु शुक्रवारी रात्री पोलिसांचा फोन आला आणि आमच्या पायाखालची जमीनच सरकल्याचे गवळी कुटुंबाने सांगितले.
शुक्रवारी ज्ञानेश्वर गवळी हा नेहमीप्रमाणे हॉटेलमधील कामकाज आटोपून हॉटेल मालकाने दिलेल्या खोलीत गेला. परंतु तेथील त्याचे सहकारी अनिकेत मानसिंग राजपूत आणि राजू सखाराम पावडे हे दारू प्यायलेले होते. त्यातच त्या दोघांसोबत ज्ञानेश्वरचे किरकोळ कारणावरून भांडण झाले. त्यातून पावडे आणि राजपूत यांनी ज्ञानेश्वरला लोखंडी रॉडने मारहाण केली. रॉडचे घाव वर्मी लागल्याने त्यातच ज्ञानेश्वरचा मृत्यू झाला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी हॉटलमधील चाकूने ज्ञानेश्वरचे शीर धडापासून वेगळे करून तेथून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी हॉटेलचे मालक शेखर बाळासाहेब दिंडे हे सकाळी आले असता त्यांना हॉटलमध्ये नोकर नसल्याचे दिसून आल्याने त्यांनी कामगारांसाठी असलेल्या खोलीत जाऊन पाहिले असता, ज्ञानेश्वर गवळीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी लगेचच याची माहिती दिघी पोलिसांना दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तसेच पळून गेलेल्या राजपूत आणि पावडेची माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरविली.
या दोघांनाही १२ तासांच्या आत पुणे पोलिसांनी अटक केली. त्यांनी प्रारंभी ज्ञानेश्वरचा खून केला नसल्याचे सांगितले, परंतु पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी कबुली दिली. ज्ञानेश्वरचा खून झाल्याने गवळी कुटुंबाला कळल्यावर ज्ञानेश्वरची आई, लहान भाऊ आणि बहीण पुणे येथे गेले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी ज्ञानेश्वरवर पुण्यातच अंंत्यसंस्कार केले.
दुर्दैव म्हणजे ज्ञानेश्वरचे वडील अंकुशराव गवळी यांचे दोन महिन्यापूर्वीच निधन झाले. दोन महिन्यात गवळी कुटुंबावर हा दुसरा आघात असल्याने कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.
वालसावंगी आणि पुण्याचे जमेना ?
वालसासावंगी येथील ज्ञानेश्वर गवळीच्या खूनाची घटना ताजी आहे. असे असले तरी यापूर्वी वालसावंगी येथील निखिल तुकाराम कोथळकर हे अभियांत्रिकी शिक्षणासाठी पुणे येथे गेला होता. परंतु त्याचाही असाच दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर दुसरा एक तरूण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेला होता. त्याचा गणपती विसर्जनाच्यावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचे नाव राजकुमार सखाराम गवळी असे आहे. त्यामुळे वालसावंगी आणि पुण्याचे जणू काही वैर आहे की काय, अशी भीती आता वालसावंगीत पसरली आहे.