जिलेटीनचा साठा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 01:08 AM2019-03-01T01:08:11+5:302019-03-01T01:09:19+5:30
विहिरीच्या खोदकामासाठी विना परवाना जिलेटीन आणि अन्य स्फोटक साहित्याचा साठा गोंदी पोलिसांनी गुरुवारी १२ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केल्याने परिसरात खळबळ उडाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : विहिरीच्या खोदकामासाठी विना परवाना जिलेटीन आणि अन्य स्फोटक साहित्याचा साठा गोंदी पोलिसांनी गुरुवारी १२ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केल्याने
परिसरात खळबळ उडाली.
गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस पथक रात्रीच्या गस्तीवर असताना, एपीआय शिवानंद देवकर यांना रेणापुरी शिवारात विहिरीचे खोदकाम करण्यासाठी अवैध स्फोटकाचा साठा घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार एपीआय देवकर, उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार अख्तर शेख, पो.कॉ. महेश तोटे, अमर पोहार, गणेश लक्कस, योगेश दाभाडे, प्रदीप आढाव, ज्ञानेश्वर मराडे यांच्या पथकाने अंतरवाली सराटी नालेवाडी (ता.अंबड) मार्गावरील रेणापुरी शिवारातील सुभाष कवडे यांच्या शेतात गुरुवारी पहाटे साडेचार दरम्यान छापा टाकला असता ब्लास्टींगचे दोन ट्रॅक्टर आढळून आले. संपतलाल चंपालाल गुर्जर (रा. पेरासोली, ता. असिद जि. भिलवाडा, राजस्थान), आंबालाल उदाराम गुर्जर, (रा. गणेशपुरा, ता.असिद जि. भिलवाडा, राजस्थान), यांना ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता, ट्रॅक्टर क्रमांक. आर.जे. ०६.आर.बी.५९५१, ट्रॅक्टर क्रमांक आर.जे.०६.आर.बी.६९९८ यामध्ये विहिर खोदतांना खडक फोडण्यासाठी वापरात येणारे जिलेटीनचा साठा मिळून आला. तो पोलीसांनी जप्त केला आहे. जिलेटीनचा वापर हा सर्रासपणे केला जात आहे.