युवकांनो, लागा तयारीला; जालना जिल्हा परिषदेची मेगा भरती, ४६७ पदे भरणार
By विजय मुंडे | Published: August 4, 2023 05:33 PM2023-08-04T17:33:37+5:302023-08-04T17:35:14+5:30
अर्ज करण्याची मुदत- ५ ते २५ ऑगस्ट; ऑनलाईन प्रवेश पत्र परीक्षेच्या ७ दिवसांपूर्वी मिळणार
जालना : जिल्हा परिषदेच्या वतीने १९ संवर्गातील गट- क ची सरसेवेची तब्बल ४६७ रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी ५ ऑगस्टपासून जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणीस प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध ४२ संवर्गांपैकी १९ संवर्गातील गट क ची तब्बल ४६७ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अधिकची जबाबदारी पडली असून, कामकाजातही विस्कळीतपणा आला आहे. कोलमडलेली यंत्रणा पाहता शासनाने जिल्हा परिषदेंतर्गत सरळ सेवेतील गट क ची रिक्तपदे भरण्यास हिरवा कंदील दिला आहे. त्यानुसार जालना जिल्हा परिषदेच्या वतीने भरती प्रक्रिया राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.
यासाठी शनिवारी ५ ऑगस्ट पासून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणीस प्रारंभ होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही २५ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी एक हजार तर इतर प्रवर्गासाठी ९०० रूपये शुल्क राहणार आहे. तर माजी सैनिक, दिव्यांगांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. एकूणच जिल्हा परिषदेतील या मेगा भरतीमुळे जिल्ह्यातील तब्बल ४६७ जणांना नोकरी उपलब्ध होणार आहे.
अशी आहेत पदे
आरोग्य पर्यवेक्षक- १, आरोग्य सेवक- ४० टक्के ४२, आरोग्य सेवक ५० टक्के- १०९, आरोग्य सेविका- १८२, औषध निर्माण अधिकारी- १२, कंत्राटी ग्रामसेवकांच्या ५० जागा भरल्या जाणार आहेत. कनिष्ट अभियंता (स्थापत्य)- २३, कनिष्ठ लेखाधिकारी- २, कनिष्ठ सहायक लेखा- ५, पशुधन पर्यवेक्षक- ४, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- १, लघूलेखक (उच्च श्रेणी)- १, लघुलेखक (निम्न श्रेणी)- १, वरिष्ठ सहाय्यक लेखा- ४, विस्तार अधिकारी (शिक्षण वर्ग ३ श्रेणी-२)- १, विस्ताराधिकारी (सांख्यिकी)- ३, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- ७, पर्यवेक्षिकांची ७ पदे भरली जाणार आहेत.
१४ संवर्गातील पदे
जिल्हा परिषदेच्या वतीने सरळ सेवेतील वर्ग 'क' मधील ४६७ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १४ संवर्गातील ही पदे भरली जाणार असून, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक, युवतींनी याचा लाभ घ्यावा.
- वर्षा मीना, सीईओ, जि.प. जालना