ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा, मुंबईला येणारच : मनोज जरांगे पाटील
By विजय मुंडे | Published: January 18, 2024 07:52 PM2024-01-18T19:52:33+5:302024-01-18T19:53:16+5:30
गावा-गावात याद्याच लावल्या नाहीत तर अर्ज करणार कोण
जालना : अंतरवाली सराटी प्रमाणे ट्रॅप रचण्याचा विचार डोक्यातून काढा. आरक्षण दिले तर आम्ही सरकारवर गुलाल उधळण्यासाठी मुंबईत येवू आणि नाही दिले तर आरक्षण घेण्यासाठी मुंबईला येणार, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. नोंदी आढळलेल्या ५४ लाख लोकांना, त्यांच्या परिवाराला २० जानेवारीपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.
आ. बच्चू कडू, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, विभागीय उपायुक्त गव्हाणे यांनी गुरूवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेवून सगेसोयरे अध्यादेश आणि कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत चर्चा केली. मराठवाड्यातील सात हजार गावांतील कागदपत्रांची तपासणी केलीच नाही. ३३/३४ च्या नोंदी तपासण्याची टक्केवारी केवळ ८ टक्के आहे. समिती हैदराबादला गेली. किती पुरावे आणले. राक्षसभुवन संस्थांकडे पुरावे आहेत. ते घेतले नाहीत. देवी लसीच्या पुराव्यांवर कार्यवाही नाही. निजामकालीन गॅझेट वापरले जात नाही. मग आरक्षण मिळणार कसे? दोन दिवसांत ५४ लाख लोकांना आणि त्यांच्या परिवाराला प्रमाणपत्र द्या असे सांगितले. परंतु, अद्याप याद्याच लावलेल्या नाहीत. सग्या सोयऱ्यांची व्याख्या तीन तीन वेळा बदलता. आता दोन दिवसांत ५४ लाख लोकांना प्रमाणपत्र देणार का ? २२ जानेवारीपर्यंत द्या. आम्ही पुण्यात असू. प्रमाणपत्र दिल्याचा डाटा द्या, आपण सांगितल्याप्रमाणे सगेसोयऱ्यांचा अध्यादेश जारी करा. तेथून गुलालाच्या ट्रक घेवून मुंबईत येवू. सरकारवर गुलाल उधळू असेही जरांगे पाटील म्हणाले.
नाेंदी सापडलेल्यांच्या याद्या लावल्या नाहीत
विभागीय आयुक्तांनी पत्र काढले. परंतु, अनेक गावांत नाेंदी सापडलेल्यांच्या याद्याच लावण्यात आलेल्या नाहीत, असे म्हणत जरांगे पाटील यांनी काही गावच्या सरपंचांना थेट फोन करून आ. कडू यांच्याशी संवाद साधून दिला. समोरून येणारी उत्तरे पाहता आ. कडू यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले. यंत्रणा काम करीत नसेल तर ही चुकीची बाब आहे. काम न करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत करा, अशा सूचनाच आ. कडू यांनी वरिष्ठांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या.
आम्ही येतो २० तारखेला
मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आ. बच्चू कडू यांनी आम्ही येतो २० तारखेला असे म्हणताच उपस्थितांच्या नजरा आ. कडू यांच्याकडे वळाल्या. आपण आरक्षणासाठी प्रयत्न करीत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास समाजासोबत मी ही आंदोलक म्हणून राहणार असल्याचे आ. कडू म्हणाले.