तेरी मिट्टी में मिल जावाँ..., उठो जवान देश की वसुंधरा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 01:09 AM2020-01-25T01:09:20+5:302020-01-25T01:09:33+5:30
‘लोकमत’ कॅम्पस क्लब आणि जालना स्टिल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ‘लोकमत’ कॅम्पस क्लब आणि जालना स्टिल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी शालेय विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गीते गाऊन अंगावर रोमांच उभे केले होते. मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहातील वातावरण देशभक्तीमय बनले होते.
प्रारंभी उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते घनश्याम गोयल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी शहीद जवानांचे वडील केशवराव कदम (रा. सोमठाणा ता. बदनापूर), वीरपत्नी लीलाबाई पंडितराव लहाने (रा. टेंभुर्णी ता. जाफराबाद) यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. बनभेरू यांनीही या कार्यक्रमासाठी भरीव अशी मदत केली. त्यांच्यावतीने शहीद जवानांच्या वारसांना साडीचोळी आणि धोतरजोड्याची भेट देण्यात आली.
उद्घाटनपर मार्गदर्शन करताना गोयल म्हणाले, ‘लोकमत’ने देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजित करून एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची बिजे रूजविण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे जिल्हाप्रतिनिधी संजय देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन जालन्याचे वितरण प्रमुख किशोर मरकड यांनी केले. परीक्षकांची भूमिका ज्येष्ठ संगीतकार सखाराम बोरूळ आणि ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार अश्विनी वासडीकर यांनी निभावली. उपस्थितांचे आभार शाखा व्यवस्थापक दीपक कदम यांनी मानले.
जयोस्तुते... जयोस्तुते...
या गीत गायन स्पर्धेत सरस्वती भूवन शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘उठो जवान देश की, वसुंधरा पुकारती, देश है पुकारता, पुकारती है माँ भारती...’ तसेच जनजनी जन्मभूमी स्वर्ग से महान है.., जयोस्तुते... जयोस्तुते... जयोस्तुते.. महामंगले, वंदे मातरमऽऽ यासह केसरिया चित्रपटातील ‘तेरी मिट्टी में मिल जावाँ..’ अशा एकापेक्षा एक सरस गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
या शाळांनी घेतला सहभाग
अनिल जिंदल स्कूल, सरस्वती भुवन स्कूल, कोठारी इंटरनॅशनल स्कूल, किड्स कॅम्ब्रिज स्कूल, आॅक्सफर्ड इंग्लिश स्कूल, पार्थ सैनिकी शाळा, एम. एस. जैन स्कूल, सीटीएमके. स्कूल, सेंट जॉन इंग्लिश स्कूल, अंकुर विद्या मंदिर स्कूल, किंग्स इंग्लिश स्कूल, पोदार इंग्लिश स्कूल, आनंद विद्या मंदिर, प्रयाग विद्यालय, राजेश्वर विद्यालय, संस्कार प्रबोधनी स्कूल, रेयान इंटरनॅशनल स्कूल, वारकरी शिक्षण संस्था मंठा