जालना शहराला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी तुडुंब; पाण्याची चिंता मिटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 12:08 AM2019-10-28T00:08:32+5:302019-10-28T00:08:37+5:30
जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना शहराची तहान भागविणारा घाणेवाडी तलाव परतीच्या पावसाने ओव्हरफ्लो झाला आहे. रविवारी रात्री उशिरा हा तलाव तुडुंब भरून वाहू लागल्याने जालनेकरांना किमान एक वर्ष तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
जालना शहरापासून अवघ्या सात किलोमीटरवर या तलावाची उभारणी ही निजामकाळात झाली आहे. साधारणपणे १९३२ मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले होते. हा तलाव बांधताना जालना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेऊन तो बांधण्यात आला आहे. त्यामुळे या तलावातून जालन्यातील जेईएस महाविद्यालय जवळ असलेल्या जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत गुरुत्वबलाने पाणी पाईप लाईनव्दारे येते. वीजेचा मोठा खर्च यामुळे वाचतो.
संपूर्ण पावसाळ्यात या तलावात थेंबही नव्हता. परंतु २१ आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने या तलावाच्या कॅचमेंट एरियात भरपूर हजेरी लावल्याने तलावात हळूहळू पाणी येत गेले. रविवारी मध्यरात्री या तलावातील पाणी पातळी ही साडे अठरा फुटांवर पोहोचल्याने तो सकाळी ओव्हरफ्लो झाल्याचे सांगण्यात आले.
जालना शहराला आज जरी जायकवाडी येथून पाणीपुरवठा होत असला तरी, घाणेवाडी जलाशयातून संपूर्ण नवीन जालना क्षेत्राला पाणीपुरवठा करणे शक्य होते. यामूळे पालिकेची किमान एक वर्षाचा त्रास कमी झाला असून, नागरिकांना या पाण्याचे नीट नियोजन केल्यास टंचाई जाणवणार नाही. हा तलाव भरल्याने त्याच्या खाली असलेले जवळपास पाच बंधारे देखील पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.