बोरगाव येथील गिरिजा नदीत युवक गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 12:46 AM2019-10-09T00:46:47+5:302019-10-09T00:47:06+5:30
भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर /जाफराबाद/ माहोरा: मागील तीन-चार दिवसांपासून विजांच्या कडकडाटात परतीचा पाऊस जिल्ह्यात हजेरी लावत आहे. परतूर तालुक्यातील सोयजना शिवारातील शेतात मंगळवारी दुपारी शेतमजूर म्हणून काम करणाऱ्या युवतीचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर दोन महिला ्रजखमी झाल्या. या आस्मानी संकटात गत तीन दिवसांत जिल्ह्यात सहा जणांचा बळी गेला आहे.
जाफराबाद तालुक्यातील येवता (जि.जालना) येथील अंबादास माधवराव दळवी (४०) हे सोमवारी शेतात गेले होते. तोडलेली मिरची भिजू नये म्हणून झाडाच्या आडोशाला मिरची झाकून ठेवत होते. मात्र, दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक वीज पडल्याने अंबादास दळवी यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार डकले, पोहेकॉ सहाणे, मंडळाधिकारी गोत्राने, तलाठी देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयताच्या पार्थिवाचे ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, मयत शेतक-याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
जिल्ह्यात मंगळवारीही पाऊस झाला. पाऊस आल्याने सोयजना (ता.परतूर) शिवारात शेतात काम करणा-या गजाला हबीब शेख (१९) व इतर महिला बैलगाडीखाली बसल्या होत्या. मात्र बैलगाडीवर वीज पडल्याने शेख यांचा मृत्यू झाला. तर इतर दोन महिला जखमी झाल्या.
विजयादशमीसाठी सोमीनाथ आला होता घरी
सोमीनाथ गोरखोदे हा औरंगाबाद येथे सैन्य भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता. मंगळवारी विजयादशमी असल्याने तो घरी आला होता. मात्र, ऐन विजयादशमीच्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळी नायब तहसीलदार काशीनाथ तांगडे, मंडळाधिकारी किरण थारेवाल, दळवी, हसनाबाद ठाण्याचे बोर्डे, मोरे, सरपंच माधवराव हिवाळे आदींची उपस्थिती होती. रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली.
शोधकार्य : नदीकाठी नागरिकांचा जमाव
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू येथील सोमीनाथ सुखलाल गोरखोदे (१८) हा युवक मंगळवारी दुपारी शेतात जात होता. गिरिजा नदीच्या पात्रात पोहत तो नदीच्या पलीकडे जात होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. भोकरदन येथील अग्निशमन दलाने शोधकार्य सुरू केले. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागला नाही. प्रशासकीय अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.