मुलगी हीच आपल्या घराची खरी भाग्यलक्ष्मी- राधाकृष्ण महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:01 AM2019-03-06T01:01:40+5:302019-03-06T01:01:58+5:30
किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जनकपूरीहून जानकी सासरी म्हणजे अयोध्येत आलेली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी जानकीकडे महाराणीच्या रुपात पाहात आहे. परंतू जानकी जर महाराणी असेल तर अगोदर श्रीरामांना राजपदावर विराजमान व्हावे लागणार आहे. अर्थात रामाला राजा मानायला हवे परंतु तसे नाही. जानकीला लोक महाराणीच्या स्वरुपात बघत आहेत. अर्थात मुलगी ही आपल्या घरासाठी भाग्यश्री आहे.
शिल- संकोच आणि सदाचार या गुणांमुळे मुलीचा दर्जा उंचावलेला आहे. तो उंचावण्यासाठी वडीलांपेक्षाही आईचं वागणं चांगल हव आहे. कारण आईच अनुकरण मुली करत असतात. त्यांना शिकवण्याची गरज भासत नाही. त्या आपोआप शिकतात. किती तरी गुण मुलींमध्ये असतात. म्हणूनच ती नुसती भाग्यश्री नाही तर भाग्यलक्ष्मी देखील आहे, असा हितोपदेश गोत्सव प. पू. राधाकृष्ण महाराज यांनी येथे बोलताना दिला.
श्रीराम गोभक्त सेवा समितीतर्फे गौरक्षण पांजळापोळ परिसरातील स्व. रामेश्वर लोया सभा मंडपात आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेत ते बोलत होते. पुढे बोलताना प. पू. राधाकृष्ण महाराज म्हणाले की, पित्यापासून स्थिती शिकवली जाते तर गुरु हे गती शिकवतात. परंतु मती शिकवण्याचं काम आई करत असते. मुलगी जेव्हा नटते तेव्हा त्या मुलीला वाटत असते मी माझ्या आईसारखी दिसली पाहिजे. मुलाचे तसे नाही. तो जेव्हा नटतो तेव्हा कुणाचे तरी अनुकरण करत असतो. तो म्हणत नाही मी माझ्या वडिलांसारखा दिसलो पाहिजे. मुलींना स्वयंपाक शिकवला जातो का? रांगोळी शिकवली जाते? शील- चारित्र्याचे धडे दिले जातात का? नाही ती आपोआप शिकते. कारण आपली आई काय- काय करीत आहे, हे ती पाहत असते आणि तशा प्रकारचे अनुकरण करायला करू लागते असे महाराजांनी सांगितले.