दहावीत मुलींचाच डंका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:00 AM2018-06-09T01:00:56+5:302018-06-09T01:00:56+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९२ टक्के लागला असून,निकालात मुलींनी ९३.१६ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा आॅनलाइन निकाल शुक्रवारी जाहीर झाला. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९२ टक्के लागला असून,निकालात मुलींनी ९३.१६ टक्के गुण मिळवत बाजी मारली आहे. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश मिळविले आहे.
जिल्ह्यातील ३७७ शाळांमधील १८ हजार ३८३ मुले,१३ हजार ५३९ मुली, असे एकूण ३१ हजार ९२२ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेचे फार्म भरले होते. यातील १८ हजार ३०७ मुले, १३ हजार ४९८ मलींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पैकी १६ हजार २३ मुले व १२ हजार ५७५ मुली, असे एकूण २८५९८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८७.९२ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९३.१६ टक्के इतके आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.९२ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यात जाफराबाद तालुक्याचा सर्वाधिक ९६.२४ टक्के लागला आहे. दरम्यान, दुपारी शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी मोबाईलसह इंटरनेट कॅफेवर निकाल पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. श्री शिवाजी हायस्कूल रामनगर या शाळेचा निकाल ९६.७७, स्व. नंदकिशोर साहनी माध्यमिक विद्यालयाचा ८४. ८१ टक्के, मराठवाडा शेती साहाय्य मंडळ संचलित आमची शाळेचा शंभर टक्के, चक्रवती सम्राट अशोक शिक्षण संस्था, नजिक पांगरी या शाळेचा निकाल शंभर टक्के , तसेच जिजाऊ माध्यमिक विद्यालय शेलगावचा निकाल ९७.६८ टक्के इतका लागला आहे.
जाफराबाद : तालुक्याचा सरासरी निकाल ९६.२३ टक्के लागला आहे. तालुक्यातील ३७ माध्यमिक शाळांमधून २ हजार ७३९ विद्यार्थी परीक्षेस बसले होते पैकी २ हजार ६३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ३७ माध्यमिक शाळा पैकी तब्बल ११ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये लुबूंनी विद्यालय कुंभारझरी, जिजामाता माध्यमिक विद्यालय निमखेडा, आयशा उर्दू हास्कुल टेंभुर्णी, श्री छगणरावजी भूजबळ विद्यालय आसई, शिवाजी विद्यालय बोरगाव फदाट, स्व. भास्कराव शिंगणे महाविद्यालय माहोरा, छत्रपती संभाजी राजे भोसले विद्यालय बेलोरा, संभाजीराजे माध्यमिक विद्यालय जवखेडा ठेंग, सेठ एकनाथ विद्यालय व शेठ भवाणीदास काबरा उर्दू विद्यालय टेंभुर्णी, फातेमा उर्दू माध्यमिक विद्यालय,जिजाऊ माध्यमिक विद्यालय जाफराबाद,या शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तीन हजार विद्यार्थी नापास
जिल्ह्यात एकूण ३१ हजार ८०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पैकी २८ हजार ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर तीन हजार २०७ विद्यार्थी अनुउत्तीर्ण झाले आहेत. मराठवाडा विभागात बीड, औरंगाबादनंतर जालना जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. बीडचा निकाल ९२.५४ टक्के तर औरंगाबादचा ९०.८५ तर जालना जिल्ह्याचा निकाल ८९.९२ टक्के लागला आहे.