पैसा, बंगला, गाडी द्या अन् नवऱ्याला जणू विकतच घ्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:24+5:302021-07-28T04:31:24+5:30
जालना : शासनाकडून हुंडा मागणी प्रथेला पायबंद बसावा, यासाठी कडक कायद्याची निर्मिती केली असली तरी कायद्याला न ...
जालना : शासनाकडून हुंडा मागणी प्रथेला पायबंद बसावा, यासाठी कडक कायद्याची निर्मिती केली असली तरी कायद्याला न जुमानता पैसे अथवा साहित्याच्या रुपाने हुंडा मागितला जात आहे. लग्नानंतरही राहिलेला हुंडा मागणाऱ्यांची संख्या कमी नाही. त्यामुळे लग्न करताना नवऱ्या मुलाला जणू मुलीचे वडील हुंडा रूपाने विकतच घेत आहेत.
हुंडा देणे-घेणे गुन्हा असला तरी हुंडा दिल्याशिवाय लग्न जुळत नसल्याचे वास्तव आहे. मुलीचा सुखी संसार होण्यासाठी मुलीकडचे उसनवारी वेळप्रसंगी कर्ज काढून हुंड्याची रक्कम जमा करतात. हुंड्यासाठी रक्कम कमी पडली तर लग्नानंतर रक्कम देण्याची ग्वाहीही देतात. मात्र, यातून पुढे संसार बिनसल्याचे प्रकार घडत आहेत. येथील भरोसा सेलकडे दीड वर्षाच्या काळात २१२ विवाहितांनी सासरी छळ होत असल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. यात हुंड्यासाठी छळ झाल्याच्या तक्रारींचा समावेश आहे.
हुंडा म्हणायचा की पोराचा लिलाव?
आताच्या काळातही काही जण हुंडा न घेता गाडी, बंगला, फ्लॅट, प्लॉट आदींची मागणी करतात.
लग्नात कन्यादानात झालेल्या मुलीच्या पैशांवरही सासरच्या मंडळींची नजर असते.
काही जण लग्नानंतर नोकरी, घर बांधण्यासाठी मुलीच्या वडिलांकडून पैशांची मागणी करीत असल्याचे पाहायला मिळते.
सध्या बहुतांश तरुण हुंडा घेण्यास नकार देत आहेत. पूर्वी हुंडा घेऊनच लग्न गेले जात होते. मी हुंडा न घेता लग्न गेले आहे. आता नवीन पिढीला सर्व बाबी समजत असल्याने ते हुंडा घेत नाही.
- संदीप सोनवणे
पूर्वी मुलींचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे प्रत्येक जण हुंडा घेत होता. आता मात्र मुलींची कमतरता आहे. हुंड्याच्या प्रथेला पायबंद बसला आहे. तरुणांनी हुंडा घेऊ नये.
- भागवत खरात
अशिक्षितांपासून उच्च शिक्षितांपर्यंत...
n हुंडा मागणाऱ्यांमध्ये अशिक्षितांपासून ते उच्च शिक्षितांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. आपल्या ऐपतीप्रमाणे वस्तू, दागिन्यांच्या स्वरूपात हुंडा मागितला जातो.
n लग्नासाठी होणारा खर्च, डीजेचा खर्च, वरातीच्या वाहनांचा खर्च आणि मंगल कार्यालयाच्या खर्चासह इतर खर्चही मुलीच्या वडिलांना करावा लागतो.