मराठा समाजाला ओबीसीमधून नको, स्वतंत्र आरक्षण द्या; छगन भुजबळ यांचा एल्गार
By विजय मुंडे | Published: November 6, 2023 11:50 AM2023-11-06T11:50:17+5:302023-11-06T11:51:07+5:30
छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथून भुजबळ यांचा एल्गार
वडीगोद्री ( जालना) : आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. समानता निर्माण करण्यासाठी आहे. 70 वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आरक्षण मिळाले असून अजूनही समाज मागासच आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, पण सरसकट ओबीसीतून नको, तर स्वतंत्र आरक्षण द्या, असा एल्गार ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी केला. ते आज सकाळी छत्रपती संभाजीनगरहून -बीडकडे जात असताना अंतरवाली सराटीकडे जाणाऱ्या महामार्गावरील वडीगोद्री येथे बोलत होते.
मंत्री छगन भुजबळ यांनी दोदडगाव येथील मंडलस्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर वडीगोद्री येथे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, 17 तारखेला जालना जिल्ह्यातील अंबड येथे ओबीसीच्या महामोर्चाचे आयोजन केले असून सर्वांनी एकत्र यावे. निमंत्रणाची वाट न पाहता मोर्चाला या. सर्व ओबीसींनी एकत्रित येऊन उपोषण,मोर्चेकाढून एका आवाजात उभे राहावे लागेल. नाहीतर आपल्या लेकरा बाळांचे भवितव्य धोक्यात येईल, असा इशारा देखील भुजबळ यांनी दिला.
सर्वांनी एकत्र आवाज उठवावा लागेल
आपल्यावर अन्याय होत असेल, दुःख झालं असेल तर कोणीही औषध देणार नाही. ज्यांची नोंद अगोदर असेल त्यांना सर्टिफिकेट देण्यास हरकत नाही. मात्र संपूर्ण राज्यात असेच वाटप करू नये. समोरच्या दरवाज्यातून इंट्री मिळत नाही म्हणून तुम्ही मागच्या दरवाजाने येण्याचा हा प्रकार आहे. यासाठी माळी,कोळी, धनगर,वंजारी, तेली, तांबोळी साळी, यांनी वेगळवेगळा आवाज उठवू नये, सर्वांनी एकत्र आवाज उठवावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले.