शाळा, महाविद्यालयांना भेटी द्या; मुलींचे प्रश्न जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 01:10 AM2019-12-05T01:10:42+5:302019-12-05T01:11:19+5:30
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शिवाय ठाण्यात येणाऱ्या तक्रार अर्जांची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महिला, मुलींची छेड-छाड रोखण्यासाठी दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील विविध पथकांनाही सूचना दिल्या आहेत.
हैदराबाद येथील अमानवीय घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्तरातूून निषेध केला जात आहे. महिला, मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्हा पोलीस दलातील विविध पथकांसह ठाणे प्रभारींना दक्षता व उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोउपनि पल्लवी जाधव आणि त्यांचे सहकारी शाळा, महाविद्यालयासह खासगी शिकवणीच्या परिसरात, बाजारपेठेत गस्त घालत आहेत. शिवाय येणा-या तक्रारीनुसार कारवाईही हे पथक करीत आहे. दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील प्रभारी अधिकाऱ्यांनीही महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. गस्तीवर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनाही शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, खासगी शिकवणीला भेटी देणे, या परिसरातील टवाळखोरी करणाºयांवर कारवाई करणे, महिला, मुलींकडून येणाºया तक्रारींची तात्काळ दखल घेत शहानिशा करून कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत. शिवाय शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना देण्यासही सूचित केले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विशाखा समित्यांनीही सतर्क रहावे, याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले.
महिला, मुलींनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, यासाठी १०० व १०९१ हा टोलफ्री क्रमांक २४ तास सेवेत ठेवण्यात आला आहे.
ठाणे प्रभारी अधिका-यांनी आपले मोबाईल नंबर शाळा, महाविद्यालयांमध्ये द्यावेत, मुलींशी संवाद साधवा, मुलींनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात, सुरक्षात्मक वातावरण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत.