'सोना दो, वरना छोडेंगे नही'; किराणा दुकानदाराचे घर फोडून साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास
By दिपक ढोले | Published: March 25, 2023 06:58 PM2023-03-25T18:58:48+5:302023-03-25T18:59:13+5:30
जालना शहरातील अग्रेसेन नगर येथील घटना
जालना : किराना दुकानदाराचे घरफोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह चार लाख ६० हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना जालना शहरातील अग्रेसेन नगर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
संजय खांडेभराड हे किराणा दुकान चालवितात. ते कुटुंबियांसह अग्रसेननगर येथे राहतात. शुक्रवारी रात्री संजय खांडेभराड, त्यांची पत्नी व आई-वडील हे झोपी गेले होते. आई-वडील एका खोलीमध्ये तर त्यांची पत्नी बेडरूममध्ये झोपली होती. संजय खांडेभराड हे हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात प्रवेश केला. दोघे जण संजय खांडेभराड यांच्याजवळ उभा राहिले तर दोघे जण त्यांच्या आई-वडिलांच्या रूममध्ये गेले.
चोरट्यांनी संजय खांडेभराड यांना ओढत आई-वडिलांच्या रूममध्ये नेले. त्यांच्या पत्नीलाही त्या रूममध्ये आणले. सोना कहा रखा हे जल्दी निकालो नही तो छोडूंगा नही असे म्हणून त्यांनी काठीने मारण्याची धमकी दिली. नंतर चौघे जण ड्रेसिंग रूममध्ये गेले. तेथे त्यांनी वस्तू फेकून दिल्या. एका डब्यात ठेवलेले ७५ हजारांचे नेकलेस, २५ हजारांची मण्याची पोत, १५ हजारांची सोन्याची अंगठी, ७५ हजारांची पोत, ७५ हजारांचे झुंबर, १५ हजारांची सोन्याची अंगठी असा एकूण ४ लाख ६० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. नंतर चोरटे तेथून निघून गेले. संजय खांडेभराड यांनी याची माहिती सदर बाजार पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले होते.