मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 12:56 AM2019-04-03T00:56:27+5:302019-04-03T00:56:55+5:30

मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.

Government machinery ready for voting | मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांची जय्यत तयारी करण्यात आली असून, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशी माहिती परभणी लोकसभा मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अंबड उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी पत्रकार परिषदेत मंगळवारी दिली.
येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परभणी लोकसभा मतदारसंघात समाविष्ट घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकूण ३३९ व कुंभार पिंपळगाव येथील सहाय्यकारी मतदान केंद्र अशा एकूण ३४० मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. घनसावंगी विधानसभा मतदारसंघात ३१ जानेवारी २०१९ पर्यंत नोंदणी करण्यात आलेले १ लाख ५९ हजार ८८४ पुरूष व १ लाख ४७ हजार ७७७ स्री असे एकूण ३ लाख ७ हजार ६२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
२०१४ च्या निवडणुकांच्या तुलनेत यावेळी तब्बल २३ हजार ५०० नवीन मतदारांची नोंदणी नोंदविण्यात आली आहे. ३४० पैकी अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तीन, घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव, चितळी पुतळी असे एकूण सहा मतदान केंद्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या सहा मतदान केंद्रावर मायक्रो निरीक्षकांच्या माध्यमातून निवडणूक आयोग करडी नजर ठेवणार आहे.
निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये पारडगाव, जांबसमर्थ, सुखापुरी व राणी उंचेगाव या चार ठिकाणी स्थिर पथकांची व तीन भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर निवडणुका संपन्न करण्यासाठी १८०० कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी, कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे, सदरील कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण २३ मार्च रोजी पूर्ण करण्यात आले असून, दुसरे प्रशिक्षण ७ एप्रिल रोजी तर तिसरे प्रशिक्षण मतदानाच्या आदल्या दिवशी १७ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
यावेळी अंबडच्या तहसीलदार मनीषा मेने, घनसावंगीचे तहसीलदार चंद्रकांत शेळके, संदीप मोरे, केशव डकले, मिरासे, पांडुरंग देशपांडे आदींची उपस्थिती होती.
घनसावंगी तालुक्यातील मोहपुरी येथे आदर्श दिव्यांग मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रावर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी दिव्यांग असणार आहेत. तसेच घनसावंगी तालुक्यातील बहिरेगाव व जालना तालुक्यातील कचरेवाडी येथे सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
४या दोन्ही मतदान केंद्रांवर सर्व मतदान अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीस बंदोबस्त महिलांचा राहणार आहे. निवडणूक कामात कोणत्याही प्रकारची कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिला.

Web Title: Government machinery ready for voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.